राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी आपल्या दीड तासाच्या भाषणात ‘नीट’, मणिपूरमधील पेच, राज्यघटना, काँग्रेस, पश्चिम बंगाल, रोजगार, भ्रष्टाचार, सीबीआय, ईडी, संघराज्यरचना, आणीबाणी, जम्मू-काश्मीर, दलित आदी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ‘देशातील तरुणांना मी खात्री देतो की, तुमची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठीच एकापाठोपाठ एक कारवाई होत आहे,’ असे त्यांनी ‘नीट’प्रश्नी नमूद केले. जवळपास ३२ मिनिटे भाषण केल्यावर त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे टीकेचा रोख वळवला. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी सभात्याग केला. त्यावर ‘ऑटो पायलट आणि रिमोट पायलटवर सरकार चालवण्याची सवय असलेले लोक काम करण्यावर विश्वास ठेवत नाहीत. तर्क संपले की, आरडाओरडा करतात किंवा मैदानातून पळ काढतात,’ असा हल्लाबोलही मोदी यांनी केला.
‘आज ईशान्य भारत पूर्व आशियाशी व्यापाराचे प्रवेशद्वार बनत आहे. या राज्यांत नव्वदच्या दशकात दहा वेळा राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली. हा इतिहास समजून घेऊन परिस्थिती सुधारायची आहे. मतपेढी नसल्याने त्यांनी वर्षानुवर्षे ईशान्येला त्यांच्या नशिबावर सोडले आहे. ईशान्येत जे काम आम्ही पाच वर्षांत केले, ते करण्यास काँग्रेसला २० वर्षे लागली असती,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत नमूद केले.
‘मुलायमसिंह यादव म्हणाले होते की, काँग्रेसशी लढणे सोपे नाही. ते तुम्हाला तुरुंगात टाकतील. नेताजी खोटे बोलत होते का, हे मला रामगोपाल यादव यांना विचारायचे आहे. त्यांनी कृपया आपल्या पुतण्याला (अखिलेश) हेही लक्षात आणून द्यावे, की राजकारणात येताच सीबीआय त्यांच्याही मागे लागली होती. सीबीआय हा पिंजऱ्यात बंदिस्त पोपट आहे, जो मालकाच्या आवाजात बोलतो, असे यूपीए सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते,’ असे मोदी यांनी अधोरेखित केले.
‘काँग्रेसमधील एकजण निकाल आले, तेव्हापासून एकटाच झेंडा घेऊन धावत आहे. आम्हाला १० वर्षे झाली आणि अजून २० वर्षे बाकी आहेत. एक तृतीयांश कार्यकाळ पूर्ण झाला आणि दोन तृतीयांश बाकी आहे. म्हणूनच त्याच्या तोंडात तूपसाखर पडो,’ असा टोला मोदी यांनी जयराम रमेश यांना लगावला.
धनखड संतापले
विरोधी पक्षांच्या सभात्यागावर संतापलेले सभापती जगदीप धनखड यांनी ही राज्यघटनेचीच थट्टा असल्याचे म्हटले. ‘आज ते सभागृह नव्हे, तर शिष्टाचार मोडून निघून गेले आहेत. आज त्यांनी माझ्याकडे नव्हे, राज्यघटनेकडे पाठ फिरवली आहे. घेतलेल्या शपथेचा अनादर केला,’ असे धनखड म्हणाले.
सतत खोटारडेपणा : खर्गे
‘सतत खोटे बोलणे, लोकांना गोंधळात टाकणे व सत्याच्या विरोधात बोलणे ही त्यांची सवय आहे,’ असे प्रत्युत्तर खर्गे यांनी दिले. ‘तुम्ही राज्यघटनेच्या विरोधात होता. राज्यघटना कोणी बनवली आणि त्याच्या विरोधात कोण बोलले हे मला त्यांच्यासमोर मांडायचे होते, असेही त्यांनी सांगितले.