काय आहे प्रकरण?
एएनएसए वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रोमजवळील लॅझिओ येथे गेल्या महिन्यात सतनामसिंग या ३१ वर्षीय कंत्राटी शेतमजुराचा स्ट्रॉबेरी रॅपिंग मशिनमध्ये हात कापला गेला होता. त्यानंतर मालकाने त्याला सोडून दिले होते. जखमी अवस्थेत सापडल्यानंतर त्याला विमानाद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दोन दिवसांनंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यासाठी जबाबदार असल्याच्या संशयावरून कंत्राटदार लोव्हॅटो याला मंगळवारी अटक करण्यात आली.
या आधीच्या वृत्तानुसार, लोव्हाटो याने सिंग आणि त्यांच्या पत्नीला एका व्हॅनमध्ये बसवले आणि त्यांना त्यांच्या घराजवळ रस्त्याच्या कडेला सोडले. सिंग यांचा कापलेला हात फळांच्या क्रेटमध्ये ठेवण्यात आला होता. या घटनेनंतर सिंग यांच्या पत्नी सोनी यांच्यावर मोठा आघात झाला होता. ‘आम्ही अटकेच्या बातमीची वाट पाहात होतो. लोव्हॅटो याने सर्वात वाईट गोष्ट ही केली, की सतनामला रुग्णालयात नेण्याऐवजी घराबाहेर सोडून दिले,’ असे लॅझिओ येथील भारतीय समुहाचे अध्यक्ष गुरुमुख सिंग यांनी सांगितले.
इटलीमध्ये संताप
सिंग यांच्या मृत्यूमुळे इटलीमध्ये बेकायदेशीर कंत्राटदारी आणि गुलामगिरीच्या आधुनिक प्रकारांवर संताप व्यक्त होत आहे. स्थलांतरित शेतमजुरांचे अनेकदा हिंसक शोषण ही विशेषतः दक्षिण इटलीमधील जुनी समस्या आहे. लॅटिनामध्ये हजारो स्थलांतरित मजूर राहतात, त्यापैकी बरेच शीख आहेत. हे मजूर स्थानिक माफियांसाठी फळे आणि भाजीपाला उचलण्याचे काम करतात. ‘आयएनएआयए’ या कामाच्या ठिकाणी अपघाती विमा उतरविणाऱ्या संस्थेच्या माहितीनुसार, या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत इटलीमध्ये २६८ प्राणघातक अपघात झाले आहेत. गेल्या वर्षी ते सुमारे शंभर इतके होते.
भारताकडून चिंता व्यक्त
सतनाम सिंग यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी भारताने इटलीकडे केली. परराष्ट्रसेवेतील अधिकारी मुक्तेश परदेशी यांनी स्थलांतर धोरणाच्या महासंचालक लुइगी मारिया विग्नाली यांच्याकडे सिंग यांच्या मृत्यूबद्दल भारताची काळजी कळवली आहे, असे इटलीतील भारतीय दूतावासाने ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
शेतात काम करणाऱ्या हजारो भारतीय स्थलांतरितांपैकी एक सिंग हे अमानवी कृत्यांचा बळी ठरले आहे. ही अमानुष कृत्ये इटलीच्या लोकांशी संबंधित नाहीत. रानटीपणाचे कृत्य करणाऱ्याला कठोर शिक्षा होईल.– जॉर्जिया मेलोनी, पंतप्रधान, इटली