दक्षिण कोरियातून असंच एक हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे. जिथे एका रोबोटने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मध्य दक्षिण कोरियातील एका नगरपालिकेने हे जाहीर केल्यानुसार, एका रोबोटने स्वतःला पायऱ्यांवरून खाली पाडत संपवण्याचा प्रयत्न केला.
वर्षभरापासून प्रशासकीय कामात मदत
डेली मिररच्या रिपोर्टनुसार, हा रोबोट महापालिकेच्या कामात मदत करत होता. महापालिकेच्या पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा रोबोट गुमी शहरातील रहिवाशांना सुमारे वर्षभरापासून प्रशासकीय कामात मदत करत होता. गेल्या आठवड्यात तो पायऱ्यांच्या खाली निष्क्रिय अवस्थेत सापडून आला.
प्रत्यक्षदर्शींनी रोबोटला पडण्यापूर्वी इकडे-तिकडे फिरताना पाहिले. घटनेची परिस्थिती जाणून घेण्यासाठी तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. हा रोबोट कामामुळे तणावाखाली असल्याचंही सांगितलं जात आहे.
रोबोट बनवणारी कंपनी विश्लेषण करणार
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, ‘या रोबोटचे पार्ट्स गोळा करण्यात आले असून त्याला बनवणारी कंपनी त्याचे विश्लेषण करेल.’ दुसऱ्या अधिकाऱ्याने याबाबत खंत व्यक्त करताना सांगितले की, ‘हा अधिकृतपणे शहर पालिकेचा भाग होता आणि तो आमच्यापैकीच एक होता.’ कॅलिफोर्नियातील बेअर रोबोटिक्सने विकसित केलेला हा रोबोट सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काम करायचा आणि त्याचे स्वतःचे सार्वजनिक सेवा कार्डही होते. एका मजल्यापर्यंत मर्यादित असलेल्या इतर रोबोट्सच्या विपरीत, तो लिफ्टला कॉल करू शकत होता आणि मजल्यावरुन वर आणि खाली जाऊ शकत होता.
दक्षिण कोरियात रोबोटची खूप क्रेझ आहे. येथे दहा कर्मचाऱ्यांमागे एक रोबोट आहे. येथे जगातील सर्वाधिक रोबोट्स आहेत.