नक्की काय घडले?
आश्रमातील चार मुलांचा एक ते दोन जुलै दरम्यान उलट्या आणि जुलाबामुळे मृत्यू झाला होता, तर संस्थेतील आणखी एका मुलाचा मृत्यू ३० जून रोजी मेंदूच्या विकाराने झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, तपासात २० ते ३० जूनच्या मध्यरात्री आणखी एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आश्रमात जीव गमावणाऱ्या मुलांची संख्या सहा झाली आहे. आश्रमातील ६० मुले लहान मुलांच्या सरकारी रुग्णालयात उपचार घेत असून, त्यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आश्रमात अंकित गर्ग (वय ८) नावाच्या मुलाचा २९ आणि ३० जूनच्या दरम्यान मृत्यू झाला होता. या मृत्यूची माहिती आश्रमाने प्रशासनापासून लपवून ठेवली होती. येथील कर्मचाऱ्यांनी मुलाचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला होता आणि त्यांनी त्याचे दफन केले होते, अशी माहिती समितीमधील एक अधिकाऱ्यांने दिली. अंकितच्या मृत्यूची बातमी लपविल्यामुळे शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण समोर येऊ शकले नाही.
मुले इतरत्र हलवणार
आश्रमात क्षमतेपेक्षा जास्त मुले दाखल केली जात असल्याचे समितीच्या तपासात समोर आले आहे. मुलांच्या वैद्यकीय नोंदीदेखील शास्त्रोक्त पद्धतीने ठेवल्या जात नव्हत्या; तसेच इतर बाबतीतही अनियमितता आढळली आहे. त्यामुळे येथील काही मुलांना इतर संस्थांमध्ये पाठवण्यात येणार आहे. समितीच्या अहवालावर आश्रमाची भूमिका जाणून घेण्यासाठी संस्थेच्या प्राचार्या अनिता शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटीस
‘अंकित गर्गच्या मृत्यूची माहिती प्रशासनापासून लपवून ठेवल्याबद्दल आणि इतर गैरप्रकारांबाबत आश्रमचालकांना नोटीस बजावून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा का दाखल करू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष सिंह दिली. ‘उच्चस्तरीय समितीच्या अंतरिम चौकशी अहवालाच्या आधारे आश्रम व्यवस्थापनाकडून तीन दिवसांत नोटिशीला उत्तर मागविण्यात आले असून, उत्तर मिळाल्यानंतर योग्य ती पावले उचलली जातील,’ असेही ते म्हणाले.
आश्रमातील विद्यार्थ्यांना नेमका कशामुळे संसर्ग झाला, याचे कारण अजून समजू शकले नाही; परंतु प्राथमिक तपासणी अहवालाच्या आधारे ‘कॉलरा’मुळे आश्रमातील बहुतेक मुलांची प्रकृती खालावली होती, असे समोर आले आहे.– आशिष सिंह, जिल्हाधिकारी