नेमकं काय घडले?
एक ते दोन जुलै दरम्यान या आश्रमातील चार मुलांना उलट्या आणि जुलाब होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. तर ३० जूनला आणखी एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती होती. मात्र, या आश्रमात पाच नाही तर सहा मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. २० ते ३० जूनच्या मध्यरात्री एका मुलाचा मृत्यू झाला होता. या आश्रमातील ६० मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. सर्वात पहिले ज्या मुलाचा मृत्यू झाला होता त्याच्या मृत्यूची बातमी आश्रमाने लपवून ठेवली होती, त्यामुळे रहस्य वाढलं आहे. आश्रमातील कर्मचाऱ्यांनी अंकित गर्ग (८) याचा मृतदेह त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात दिला आणि मग त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मृत्यूची बातमी लपवल्यामुळे त्याचं शवविच्छेदन करण्यात आलेलं नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळालेली नाही.
समितीच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे, या आश्रमात क्षमतेपेक्षा अधिक मुलं ठेवल्याची माहिती आहे. त्यांच्या वैद्यकीय नोंदीही ठेवल्या जात नव्हत्या. त्यांच्या व्यवहारातही अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे आता काही मुलांना इतर संस्थांमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
यासर्व प्रकाराबाबत आश्रमाला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, तीन दिवसात मुलाच्या मृत्यूची बातमी लपवल्याबाबत आणि गैरप्रकाराबाबत उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनीदिली.
या आश्रमातील मुलांच्या मृत्यूवर तपास करण्यात येत आहे. मुलांचा मृत्यू कशामुळे झाला, त्यांन संसर्ग कसा झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, प्राथमिक तपासात कॉलरामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी दिली.