मुलाच्या मेंदूत ‘अमीबिक मेनिंगोएन्फेफलाइटिस’ संसर्गानं प्रवेश केला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. दूषित पाण्यात आढळून येणाऱ्या अमिबामुळे हा आजार होतो. अमीबिक एन्फेफलाइटिस अतिशय दुर्मीळ आणि घातक प्रकारचा संसर्ग आहे. नदी आणि तलावांमध्ये आढळून येणाऱ्या अमिबामुळे हा संसर्ग होतो. गेल्या तीन महिन्यांत राज्यात अशा प्रकारे तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना २१ मे रोजी घडली. मल्लपुरममध्ये ५ वर्षीय मुलगी दगावली. दुसरी घटना २५ जूनला घडली. कन्नूरमध्ये १३ वर्षीय मुलीची प्राणज्योत मालवली.
समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या अलपुझा जिल्ह्यात २०२३ मध्ये एका मुलाचा अमीबिक मेनिंगोएन्फेफलाइटिसच्या संसर्गानं मृत्यू झाला होता. हा मुलगा झऱ्याच्या पाण्यात अंघोळीसाठी गेला होता. केरळमध्ये अमीबिक मेनिंगोएन्फेफलाइटिसच्या संसर्गाची पहिली घटना २०१६ मध्ये समोर आली. त्यानंतर २०१९, २०२०, २०२२ मध्ये अशा प्रकारची प्रत्येकी एक घटना नोंदवली गेली. या सगळ्या रुग्णांचा मृत्यू झाला. ताप, डोकेदुखी, उलट्या, अतिसार ही या आजाराची लक्षणं आहेत.
मेंदू खाणारा अमिबा माती आणि उष्ण पाण्यात आढळून येतो. ताज्या पाण्यात त्याचं वास्तव्य असतं. नदी, गरम पाण्याचे झरे, तलावात तो सापडतो. अमिबायुक्त पाणी नाकात गेल्यास धोका वाढतो. कारण नाकातून शिरलेला अमिबा थेट मेंदूपर्यंत जातो आणि संसर्गास सुरुवात होते. तो मांस खाण्यास प्रारंभ करतो. या अमिबाचा संसर्ग अँटिबायोटिक औषधांनी संपुष्टात येत नाही. संक्रमण रोखण्यात अपयश आल्यास ५ ते १० दिवसांमध्ये मृत्यू होतो.