अथक प्रयत्नांनंतर परीक्षा उत्तीर्ण, रद्द होण्याच्या भीतीने ताण, विद्यार्थ्यांची न्यायालयात धाव

नवी दिल्ली: नीट-यूजी परीक्षेत यश मिळवलेल्या गुजरातमधील ५६ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला (एनटीए) यंदा वादात सापडलेल्या नीट-यूजी परीक्षा रद्द करण्यापासून रोखण्याचे निर्देश द्यावेत,’ अशी मागणी या विद्यार्थ्यांनी याचिकेतून केली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये नीट-यूजीमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

नीच परीक्षेत पेपरफुटी अन् बनावट परीक्षार्थी

यावर्षी पाच मे रोजी घेण्यात आलेल्या नीट-यूजी परीक्षेत पेपरफुटी आणि बनावट परीक्षार्थी बसवणे, यासारख्या बेकायदा प्रकारांमध्ये सामील असलेल्या विद्यार्थी आणि इतरांची चौकशी, ओळख पटविण्याचे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला द्यावेत, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी याचिकेत केली आहे.

फेरपरीक्षा आणि गैरव्यवहारावर लवकरच सुनावणी होणार, त्यापूर्वीच विद्यार्थ्यांची याचिका

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर फेरपरीक्षा आणि गैरव्यवहारांचा आरोप झालेल्या परीक्षांबाबत चौकशी करून दिलासा देण्याची मागणी करणाऱ्या तब्बल २६ याचिकांवर लवकरच सुनावणी होणार आहे. त्याआधीच विद्यार्थ्यांनी ही याचिका केली आहे. त्यामुळे आता न्यायालय यावर काय निर्णय घेणार ते पाहावं लागेल.

पेपरफुटी प्रकरणामुळे देशात खळबळ

देशभरातील सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि इतर संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एनटीएद्वारे नीट-यूजी घेतली जाते. यंदा ही परीक्षा ४,७५० केंद्रांवर घेण्यात आली होती आणि सुमारे २४ लाख विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. या परीक्षेतील पेपरफुटीसह गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे अनेक शहरांमध्ये निदर्शने झाली आहेत; तसेच विरोधी पक्षांची या मुद्द्यावर खडाजंगी झाली आहे.

मानसिक ताण

याचिकाकर्ते विद्यार्थी १७ ते १८ वर्षे वयोगटातील तरुण विद्यार्थी आहेत. डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी १०० टक्के मेहनत घेतली असून तीन-चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ही परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. मात्र, परीक्षा रद्द होण्याची आणि सर्वांसाठी फेरपरीक्षा घेण्याची शक्यता असल्याने मानसिक ताण निर्माण होत आहे, असे याचिकेत नमूद केले आहे.

Source link

neet exam passed studentsneet exam scampetition to cancel examsupreme courtनीट परीक्षानीट परीक्षा पेपरफुटीनीट पेपरफुटी प्रकरणनीट प्रकरणविद्यार्थी
Comments (0)
Add Comment