आसाममध्ये वन्यजीवांवर पर्जन्यसंकट, सतरा प्राण्यांचा मृत्यू; २९ जिल्हे पाण्याखाली

वृत्तसंस्था, गुवाहाटी : आसाममध्ये संततधार आणि मुसळधार पावसाचा नागरिकांसोबत वन्यजीवांनाही फटका बसला आहे. काझिरंगा राष्ट्रीय अभयारण्यात सतरा प्राण्यांचा बुडाल्याने मृत्यू झाला. वन विभागाच्या प्रयत्नांमुळे ७२ पेक्षा अधिक प्राण्यांना वाचविण्यात यश आले. दरम्यान, राज्यातील ३५ पैकी २९ जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला आहे.

काझिरंगा अभयारण्यात पाण्यामुळे बळी गेलेल्या वन्यजीवांमध्ये ११ हरीण होते. वाचविण्यात आलेल्या ७२ प्राण्यांपैकी ६३ हरीण, प्रत्येकी दोन उदमांजर व सांबर असून घुबड, रानमांजर, गेंड्याचे पिलू आणि भारतीय ससा यांचाही समावेश आहे. यातील २६ प्राण्यांवर उपचार सुरू आहेत. तर प्रकृतीत सुधारणा झाल्याने २९ वन्यजीवांची सुटका करण्यात आली. पूर्व आसाम वन्यजीव विभागातर्फे २३३ ठिकाणी छावण्या उभारण्यात आल्या आहेत. वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून गस्त घातली जात आहे. दरम्यान, वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३७ वर वेगाने वाहने चालविण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

साडेसोळा लाख नागरिकांना फटका

आसाममधील ३५ पैकी २९ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून आतापर्यंत साडेसोळा लाख नागरिकांना पावसाचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रासह दिगरू आणि कोल्लोंग या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. राजधानी गुवाहाटीमधील मालीगाव, पंडू पोर्ट आणि टेंपल घाट या भागाला मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी भेट देत पूरस्थितीची पाहणी केली. पूर, भूस्खलन आणि वादळामुळे राज्यात आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला. अन्य तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. धुब्री जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. तेथील दोन लाख २३ हजार लोक पुरात अडकलेले आहेत.

लष्करातर्फे ‘जलराहत’

आसामपाठोपाठ मणिपूरमध्येही पुराची तीव्रता वाढू लागली आहे. लष्कराच्या ‘आसाम रायफल्स’ने जलराहत अभियान हाती घेतले आहे. इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम आणि थाौबल या जिल्ह्यांमध्ये पुराची स्थिती गंभीर झाली आहे. ‘आसाम रायफल्स’ला महिला, बालकांसह साडेपाचशे नागरिकांना वाचविण्यात यश आले. लष्करी जवानांनी धान्य, अन्न आणि औषधांची मदत उपलब्ध करून दिली. काही ठिकाणी स्थानिक प्रशासनासोबत लष्कराकडून मदतकार्य राबविले जात आहे.
Pune News: जेवायला बसलेले, जोराचा आवाज अन् घर कोसळलं, थरथर कापणाऱ्या आवाजात आसिफने सांगितला थरारक अनुभव

उत्तर बिहारमध्ये बहुतांश नद्यांना पूर

बिहारच्या उत्तर भागातील बहुतांश नद्यांना पूर आला असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यात कोसी, भागमती, कमला बालन, अधवरा आणि महानंदा या नद्यांचा समावेश आहे. कोसी नदीने खगडिया जिल्ह्यात ३४.०९ मीटरपेक्षा अधिक, भागमती नदीने मुजफ्फरपूर जिल्ह्यात ४९.४१ मीटरपेक्षा अधिक, अवधा नदीने सुंदरपूर, सीतामढी जिल्ह्यात ६२.१० मीटरपेक्षा अधिक प्रवाहमर्यादा ओलांडली. महानंदा नदीची पूर्णिया जिल्ह्यात ३६.२० मीटरपेक्षा अधिक पातळीवर गेली. मधुबनी आणि झांझरपूर जिल्ह्यात कमला बालन नदीने ५० मीटरपेक्षा अधिक पाणीपातळी गाठली.

Source link

assam floodsBihar Rainkaziranga national parkआसाम पाऊसआसाम प्राणी मृत्यूहवामान वृत्त
Comments (0)
Add Comment