मतदारांनी त्यांचा कौल दिलेला आहे. आम्ही बदल घडवण्यासाठी सज्ज आहोत, असं लेबर पक्षाचे नेते किएर स्टार्मर यांनी म्हटलं. स्टार्मर यांनी त्यांच्या मतदारसंघातून बाजी मारली आहे. तेच ब्रिटनचे पुढील पंतप्रधान असतील. मतमोजणीच्या सुरुवातीलाच लेबर पक्षानं मोठी आघाडी घेतली आहे. देशात एकूण ६५० जागा आहेत. लेबर पक्षानं मोठ्या विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण सुरु केलं आहे.
मतदान संपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलनंही लेबर पक्षाच्या दणदणीत विजयाचा अंदाज वर्तवला. बीबीसी-इप्सोस एक्झिट पोलनं किएर स्टार्मर यांच्या नेतृत्त्वाखालील लेबर पक्षाला ४१० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला. तर ऋषी सुनक यांच्या नेतृत्त्वाखालील कंझर्वेटिव्ह पक्षाला १३१ जागा मिळण्याचा कयास आहे.
बहुमतासाठी किती जागांची गरज?
हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत मिळवण्यासाठी ३२६ जागा लागतात. सुनक यांचा पक्ष बहुमतापासून बराच दूर राहील असा अंदाज आहे. त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. एक्झिट पोल खरे ठरल्यास लेबर पक्षाला प्रचंड बहुमत मिळेल आणि ते सत्तेत परततील. स्टार्मर देशाचे पुढील पंतप्रधान होतील. स्पष्ट निकाल हाती येण्यास आणखी काही तास लागतील.
YouGov या सर्व्हे एजन्सीनं स्टार्मर यांच्या लेबर पक्षाला ४३१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंझर्वेटिव्ह पक्षाला केवळ १०२ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. सर्व्हेंचे अंदाज खरे ठरल्यास संसदेत लेबर पक्षाला प्रचंड मोठं यश मिळेल. कंझर्वेटिव्ह पक्षाला १९०६ नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या पराभवाचा सामना करावा लागू शकतो. १९०६ मध्ये कंझर्वेटिव्ह पक्षाला १५६ जागांवर विजय मिळाला होता.