तेज पोलीस टाइम्स – परवेज शेख
( पुणे – देहू रोड )चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या तीन अल्पवयीन मुलांसह चार जणांना देहुरोड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख 40 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करुन सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई देहुगावातील काळोखे चौकात करण्यात आली. रोहित विशाल सकटे (वय-22 रा. माळवाडी, हनुमान मंदीराच्या बाजुला, देहुगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर 17 वर्षाच्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटना वाढत असल्याने तपास पथक वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पेट्रोलींग करत होते. त्यावेळी काही मुले चोरीच्या दुचाकी विक्रीकरीता काळोखे चौक, विठ्ठलवाडी देहूगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली.पथकाने सापळा रचुन तीन अल्पवयीन मुलासह चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दोन दुचाकीबाबत चौकशी केली असता दुचाकी चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी रोहीत सकटे याची पोलीस कोठडी घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने साथीदारांच्या मदतीने आणखी चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपींकडून सहा दुचाकी जप्त करुन देहुरोड, चिखली, महाळुंगे, भोसरी, खडकी, चतुश्रृंगी पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोलीस अंमलदार सुनिल महाडीक, निलेश जाधव, मोहसिन आत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे यांच्या पथकाने केली.