हाऊस ऑफ कॉमन्सच्या ६५० जागांसाठी निवडणूक
काश्मीर प्रश्नावर भूमिका घेण्यात झालेली मजूर पक्षाची चूक ते भारतासोबत संबंध आणखी सुधारण्याची चर्चा ब्रिटनच्या पूर्ण प्रचारात रंगली आणि भारतीय मतदारांना खुश करणारी आश्वासनं देण्यात आली, पण ब्रिटनमध्ये डाव्या विचारांच्या पक्षाची सत्ता येण्यामुळे भारतावर काय परिणाम होऊ शकतात, ब्रिटनमधल्या भारतीयांना नेमकी कोणती आश्वासनं देण्यात आली होती, ऋषी सुनक यांचा पराभव का झाला आणि ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांचं भारताविषयीचं मत काय आहे, जाणून घ्या सविस्तर.
जशी आपल्याकडे लोकसभा आहे, तसं ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स हे जनतेतून निवडून गेलेल्या खासदारांचं सभागृह आहे, तर आपल्या राज्यसभेप्रमाणे ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स हे ७८३ सदस्यांचं वरचं सभागृह आहे. निवडणूक झाली ती हाऊस ऑफ कॉमन्सच्या ६५० जागांसाठी. देशाची आर्थिक परिस्थिती बिघडल्यानंतर सरकारचे काय हाल होतात ते ब्रिटनच्या जनतेने या निवडणुकीत दाखवून दिलं.
मजूर पक्षाच्या जाहिरनाम्यातील मुद्दे
– मुलांच्या शिक्षणासाठी वाढलेला भरमसाठ खर्च कमी करण्याचं आश्वासन
– ब्रिटनच्या काही खाजगी शाळांमध्ये वर्षाला १५ हजार ते ५० हजार युरोपर्यंत खर्च
– खाजगी शाळांना २० टक्के व्हॅट लावून हा पैसा सरकारी शिक्षकांच्या वेतनावर खर्च करणार
– वर्षाला ३ लाख परवडणारी घरे बांधून देणार
– २०३० पर्यंत पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर बंदी, फक्त इलेक्ट्रीकला परवानगी
– पर्यावरणासाठी २४ बिलियनचा खर्च, यातून साडे सहा लाख नोकऱ्या तयार होणार
– भारतासोबत धोरणात्मक भागिदारी, मुक्त व्यापार करार करणार
यासह मजूर पक्षाने भारतीयांना खुश करणारेही मुद्दे प्रचारात वापरले. यापुढे ब्रिटनमध्ये हिंदूफोबियाला जागा नसेल असं कीर स्टर्मर जाहीरपणे म्हणाले, शिवाय ते या काळात अनेकदा हिंदू मंदिरांमध्येही दिसून आले. परिणामी मजूर पक्षाने ब्रिटनध्ये असलेल्या जवळपास १८ लाख भारतीयांना जवळ केलं. ब्रिटनचे नवे पंतप्रधान नेमके कोण आहेत?
कोण आहेत कीर स्टर्मर?
६१ वर्षीय स्टर्मर पहिल्यांदा २०१५ मध्ये खासदार म्हणून निवडून आले होते. २०१९ मधील पराभवानंतर मजूर पक्षाने स्टर्मर यांच्याकडे पक्षाची धुरा दिली. त्यानंतर आधीचे मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांच्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे पक्षाला फटका बसला. कॉर्बिन यांनी काश्मीर प्रश्नावर भारताच्या विरोधात भूमिका जाहीर केली. निवडणुकीत फटका बसला, त्यानंतर नेतृत्त्व स्टर्मर यांच्याकडे आलं. स्टर्मर यांच्याकडून भारत-ब्रिटन चांगल्या संबंधांचा अनेकदा पुनरुच्चार झाला.
भारतासोबत मुक्त व्यापार करार पुढच्या टप्प्यावर नेणार असल्याचा त्यांचा शब्द होता. जास्तीत जास्त भारतीयांना व्हिजा आणि इमिग्रेशन सोपं करण्याचं आश्वासनही देण्यात आलं.
स्टर्मर यांनी भारतीयांची मनं जिंकली आणि त्याचा फायदा त्यांना निवडणुकीतही झाला. ऋषी सुनक भारतीय वंशाचे असले आणि भारताचे जावई असले तरी भारतीय मतदारांना सोबत ठेवण्यात त्यांना अपयश आलं आणि त्याचे परिणाम निवडणुकीत दिसले. मजूर पक्षाने ६५० पैकी हा जवळपास ४१० जागा जिंकल्यात, तर ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाने फक्त ११८ जागा जिंकल्यात. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हुजूर पक्षाच्या २४८ जागा कमी झाल्या, तर मजूर पक्षाच्या २१० जागा वाढल्या. ब्रिटनच्या संसदेत आतापर्यंत १५ भारतीय वंशाचे खासदार होते, तर यावेळी १०७ भारतीय वंशाचे उमेदवार मैदानात आहेत, त्यामुळे भारत ब्रिटन संबंधांच्या दृष्टीनेही ही निवडणूक तेवढीच महत्त्वाची आहे. एकूणच खालावलेली आर्थिक परिस्थिती आणि अँटी इन्कम्बन्सी यामुळे ऋषी सुनक यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं.