ही गोष्ट आहे आयएएस अधिकारी स्मित पटेल यांची, स्मित पटेल यांचे वडील गुजरातवरून मुंबईत स्थायिक झाले होते. स्मित हे लहान असताना त्यांचे आजोबा त्यांना रामायण आणि महाभारतातील कथा सांगायचे. आजोबांनी गोष्ट सांगितल्याशिवाय त्यांना रात्री झोप येत नसे. स्मित यांच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, तरीही घरच्यांनी स्मित यांना चांगले शिक्षण दिले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्मित यांनी मुंबई विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पदवी मिळवली.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळाली असती. परंतु स्मित यांनी तसं केलं नाही. त्यांनी प्रशासनात काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेलं होतं. स्मित यांचे आजोबा हे गुजरातमध्ये राहत असताना स्थानिक निवडणुकांमध्ये सक्रिय होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य गुजरातमध्ये जिल्हा परिषद स्तरावरील निवडणुकांमध्ये काम करण्यात गेले. प्रशासकीय अधिकारी हा किती प्रभावी असतो? याबद्दल स्मितचे आजोबा नेहमी सांगायचे. यामुळेच स्मित यांनी यूपीएस्सी करण्याचा निर्णय घेतला.
2019 मध्ये स्मित यांनी पहिल्यांदा यूपीएस्सीची परीक्षा दिली. पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी पुन्हा एकदा अभ्यास सुरू केला.आणि पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा दिली पण त्यावेळीही निकाल तसाच लागला. त्यानंतर 2022 पर्यंत सलग चार वेळा स्मित यांना अपयश आलं.
सलग चार वेळा अपयश आल्यामुळे स्मित खूप निराश झाले होते. आपला यूपीएससी करण्याचा निर्णय चुकला की काय? असं त्यांना वाटू लागलं होतं. परंतु त्यांच्या आजोबांनी सांगितलेल्या महाभारत आणि रामायणातील गोष्टींतून बोध घेत पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.
स्मित यांनी पाचव्यांदा यूपीएस्सीची परीक्षा दिली. मुलाखतीच्या आधी आजोबांनी त्यांना पुन्हा समजावलं की, तू फक्त तुझं बेस्ट दे. तुला नक्की यश मिळेल यानंतर स्मित यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी मोठ्या धाडसाने मुलाखत दिली. अखेर परीक्षेचा निकाल लागला ऑल इंडिया 562 वी रॅंक मिळवून स्मित पटेल यांची आयएएस पदी निवड झाली. अपयश आलं म्हणून ध्येय सोडायचं नसतं. ही शिकवण IAS अधिकारी स्मित पटेल यांच्या प्रवासातून मिळते.