सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना घरकुल मिळवून देणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर, दि. ६ (जिमाका):सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबांना ते राहत असलेल्या घराच्या जागेचा सातबारा उतारा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत देण्याचा मानस आहे. तसेच या समाजातील कुटुंबांना याच भागातील मोकळ्या जागेत त्यांच्या हक्काचे घरकुल देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

सेटलमेंट ग्राउंड येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, विद्यार्थिंनीना मोफत शिक्षण बाबत कृतज्ञता तसेच विद्यार्थ्यांना शालेय शालेय साहित्य वाटप  व उल्लेखनिय काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार वितरण या कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भारत जाधव, डॉ. सोनाली वळसंगकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील सर्व नागरिकांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असून विशेषत: महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या असून त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरेल, यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील एक ही महिला लाभार्थी त्यांच्यासाठी असलेल्या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

तसेच या सेटलमेंट भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून या समाजातील कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून या भागातील नागरिकांना त्यांच्या घराचा उतारा देण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

भरत जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजाला शासनाने पक्के घरे द्यावीत. तसेच एक ते सहा नंबर कॉलनीत ज्यांची घरे आहेत त्यांना त्या घराचा उतारा द्यावा, अशा मागण्या केल्या.

यावेळी आई प्रतिष्ठान सोलापूर व माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिल्याबद्दल राज्य शासनाविषयी कृतज्ञता समारंभ पार पडला. तर यावेळी एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व पुरस्कार वितरण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले.

०००

Source link

Comments (0)
Add Comment