महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून राज्यातील ३ कोटी महिलांना लाभ मिळणार
  • राज्य शासनाने महिलांना प्रतिवर्षी ३ गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला
  • शासनाची महिलांसाठी पिंक ऑटो योजना लागू
  • महाविद्यालयात कायमस्वरूपी प्राध्यापक उपलब्ध करून देणार

सोलापूर, दि. ६ (जिमाका): राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना, महिलांना वर्षभरात ३ सिलेंडर मोफत, आश्रम शाळा मधील १८ वर्षांपुढील मुलींना शिक्षण शुल्क माफ, पिंक रिक्षा योजना, लेक लाडकी योजनेसह अन्य योजनांचा समावेश आहे. अशा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीच्या कृतज्ञता मेळाव्यात पालकमंत्री श्री. पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य टी.एन. शिंदे, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी नुकतेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली असून त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तीन कोटी महिलांना प्रतिमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी प्रतिवर्षी शासनाने 46 हजार कोटीची तरतूद केलेली आहे. शासनाने महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पिंक रिक्षा योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत दहा टक्के रक्कम भरून शासन महिलांना गुलाबी रंगाची रिक्षा घेण्यासाठी अर्थसहाय्य देणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.

तसेच वर्षभरात महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. उच्च शिक्षणासाठी मुलींना शंभर टक्के फी माफी केलेली आहे. लेक लाडकी योजनेतून मुलीच्या जन्मानंतर तिच्या बँक खात्यावर एक लाख दोन हजाराचे अर्थसहाय्य शासन जमा करत आहे. शासन महिलांसाठी विविध योजना राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणून पुरुषाच्या बरोबरीने सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी महिला बचत गटांना सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध केले जात आहे आरोग्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत या सर्व योजनांचा राज्यातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.  ए.आर बुर्ला महाविद्यालयासाठी विशेष बाब म्हणून कायमस्वरूपी शिक्षक व मुलींना हद्दवाढ भागात  मोफत बस पास देणे आणि  एक कार्यक्रमासाठी एक सभागृह बांधून देण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या वतीने कला शाखेचे विद्यार्थिनी प्राची भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर दशरथ गोप यांनी पद्मशाली शिक्षण संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य याविषयी माहिती दिली. तसेच राज्य शासनाने मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचे त्यांनी आभार मानले. या कृतज्ञता मेळाव्यास महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

०००

 

Source link

Comments (0)
Add Comment