हाथरस येथे २ जुलै रोजी सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित संजू यादव यालाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. चेंगराचेंगरी प्रकरणात रामप्रकाश शाक्य यालाही अटक करण्यात आली असून, त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.
कोण आहे देवप्रकाश मधुकर?
मधुकर हा सत्संगाचा मुख्य आयोजक (मुख्य सेवेकरी) होता. भोले बाबा (सुरजपाल उर्फ नारायण साकर हरी) याच्या कार्यक्रमांसाठी निधी जमा करण्याचे काम तो करीत असे. मधुकरशी काही राजकीय पक्षांनी नुकताच संपर्क साधला होता, असे हाथरसचे पोलिस अधीक्षक निपुण अग्रवाल यांनी सांगितले. मधुकर याचे आर्थिक व्यवहार आणि कॉल तपशील तपासले जात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. शनिवारी दुपारी हाथरसमधील बागला संयुक्त जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी मधुकरला वैद्यकीय तपासणीसाठी नेले. यावेळी रुग्णालयासह परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात होती.
चेंगराचेंगरीप्रकरणी हाथरसमधील सिकंदराराऊ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात आरोपीमध्ये मधुकरचे एकमात्र नाव आहे. दरम्यान, ‘मधुकरवर दिल्लीमध्ये वैद्यकीय उपचार सुरू होते. यामुळे पोलिस, एसआयटी आणि एसटीएफला दिल्लीला बोलावण्यात आले. तेथे मधुकरने आत्मसमर्पण केले,’ असा दावा त्याचे वकील ए. पी. सिंह यांनी शुक्रवारी रात्री एका व्हिडीओ संदेशाद्वारे केला. ‘आम्ही काहीही चुकीचे केले नाही, त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी आम्ही अर्ज दाखल करणार नाही, असे वचन आम्ही दिले होते. आमचा गुन्हा काय आहे, मधुकर इंजिनीअर असून त्याला हृदयरोग आहे. त्याची प्रकृती आता स्थिर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे तपासात सहभागी होण्यासाठी आम्ही आत्मसमर्पण केले,’ असेही सिंह यांनी म्हटले आहे.