बैठकीत खराब कामगिरीसाठी जबाबदार असलेल्या मुद्द्यांवर आणि भविष्यातील रणनीतीवर चर्चा झाली. या बैठकीला मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हजर होते. बऱ्याच दिवसांनी हे दोन नेते सोबत दिसले. बी. एल. संतोष यांनी दोन बैठका घेतल्या. पहिल्या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश महासचिव उपस्थित होते.
बंद खोलीत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. १० विधानसभा मतदारसंघांमध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीवर सखोल चर्चा करण्यात आली. निवडणूक जिंकण्यासाठी उचलण्यात येणाऱ्या पावलांची, रणनितीची माहिती योगींनी संतोष यांना दिली. सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकण्यासाठी काय करायला हवं, संघटनेचा दृष्टीकोन कसा असायला हवा, यावर सविस्तर मंथन झालं.
संतोष यांनी दुसऱ्या बैठकीत सहा विभागांचे प्रमुख आणि लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेले सहा प्रभारी यांच्यासोबत चर्चा केली. ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला, तिथल्या आमदारांच्या भूमिकांवर चर्चा झाली. पक्षाच्या उमेदवारांना मताधिक्क्य मिळवून देऊ न शकलेल्या आमदारांना २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याचं भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. त्यामुळ भाजपचे बरेच आमदार डेंजर झोनमध्ये आले आहेत.
सहा विभागांच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या खराब कामगिरीबद्दलचं त्यांचं आकलन सांगितलं. पंतप्रधान मोदींच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात आपल्याच लोकांनी विरोधात काम केलं. विश्वासघात करण्यात आला, असा मुद्दा मांडण्यात आला. अब की बार ४०० पारच्या घोषणेचा उलटा परिणाम झाला. या घोषणेचा फायदा होण्याऐवजी तोटा झाला, असं बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांनी सांगितलं. भाजपला ४०० जागा मिळाल्यास संविधान बदलण्यात येईल, असा प्रचार विरोधकांनी केला आणि तो प्रभावी ठरला, असं विश्लेषण नेत्यांनी केलं.