Hathras Stampede Case: विषारी पदार्थामुळेच सत्संगात चेंगराचेंगरी; भोलेबाबाच्या वकिलांचा षडयंत्र असल्याचा दावा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : हाथरसमधील दोन जुलै रोजीच्या सत्संगादरम्यान काहींनी विषारी पदार्थाचे कॅन उघडल्यानेच चेंगराचेंगरी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचा दावा भोलेबाबाचे वकील ए. पी. सिंह यांनी रविवारी केला. भोलेबाबाच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर चेंगराचेंगरी हे एक षड्‌यंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘सत्संगावेळी १५ ते १६ लोक विषारी पदार्थाचे कॅन घेऊन आले होते. त्यांनी ते कॅन गर्दीत उघडले, असे प्रत्यक्षदर्शींनी मला सांगितले. त्यांनी आपले नाव उघड न करण्याची विनंती केली आहे. आम्ही या प्रत्यक्षदर्शींच्या सुरक्षेची मागणी करणार आहोत. मी मृत्युमुखी पडलेल्यांचे शवविच्छेदन अहवाल पाहिले आहेत. त्यात त्यांचा मृत्यू जखमांमुळे नव्हे, तर श्वास गुदमरल्याने झाल्याचे दिसून येते,’ असे सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. ‘विषारी पदार्थाचे कॅन आणणाऱ्यांना पळून जाता यावे, यासाठी त्याठिकाणी वाहने उभी होती. आमच्याकडे याचे पुरावे आहेत आणि आम्ही ते सादर करू,’ असेही ते म्हणाले.

भोलेबाबा (सूरजपाल ऊर्फ नारायण साकर हरी) याच्या हाथरस येथील सत्संगादरम्यान दोन जुलै रोजी झालेल्या या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला होता. यात महिलांची संख्या जास्त होती. या प्रकरणात मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याच्यासह नऊ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
Hathras Stampede Case: हाथरस चेंगराचेंगरीतील मुख्य आरोपी अटकेत; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
‘आवश्यकता असलेल्या प्रत्येकाची चौकशी’

नोएडा : चेंगराचेंगरी प्रकरणात आवश्यकता असलेल्या प्रत्येकाची चौकशी केली जाईल, असे उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या न्यायालयीन आयोगाने रविवारी स्पष्ट केले. आयोग लवकरच एक नोटीस जारी करणार आहे. त्यानुसार स्थानिक आणि दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शींना त्यांच्या जबाबासह चेंगराचेंगरीशी संबंधित पुरावे सादर करण्यास सांगण्यात येईल, असे आयोगाचे अध्यक्ष व अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांनी पत्रकारांना सांगितले. भोलेबाबाचीही चौकशी होणार का, असे पत्रकारांनी विचारले असता, ‘या प्रकरणाच्या चौकशीसाठी आवश्यक असलेल्या कोणाशीही आयोग बोलेल,’ असे माजी आयपीएस अधिकारी भावेश कुमार यांनी नमूद केले.

भरपाईत वाढ करा : राहुल गांधी

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून हाथरस येथील चेंगराचेंगरीतील पीडितांच्या भरपाईत वाढ करण्याची; तसेच या दुर्घटनेला जबाबदार असेलल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये भरपाई देण्याची घोषणा केली आहे. मात्र, ही भरपाई अत्यंत अपुरी आहे. या रकमेत वाढ करून ती लवकरात लवकर देण्यात यावी, अशी माझी विनंती आहे, असे राहुल यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Source link

hathras stampede accusedHathras Stampede Casehathras stampede incidentRahul Gandhiyogi adithyanathउत्तर प्रदेशभोले बाबा हाथरसहाथरस प्रकरण
Comments (0)
Add Comment