‘हमास’च्या दहशतवाद्यांनी सात ऑक्टोबर रोजी हल्ला केल्यानंतर, इस्रायलने गाझा पट्टीमध्ये कारवाई सुरू केली. त्यानंतर नऊ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. आतापर्यंत ३८ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ‘हमास’ने २५०पेक्षा जास्त इस्रायली नागरिकांचे अपहरण केले होते. नोव्हेंबरमध्ये झालेल्या चर्चेवेळी १०० ओलिसांची सुटका केली होती, तर आता १२०पेक्षा जास्त ओलिस अद्यापही दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी चर्चा करण्यासाठी नेतान्याहू यांच्यावर दबाव वाढत आहे. मात्र, ‘हमास’चा नायनाट करेपर्यंत युद्ध सुरूच ठेवण्याचा पवित्रा नेतान्याहू यांनी घेतला आहे. आतापर्यंत ४०पेक्षा जास्त ओलिसांचा मृत्यू झाला असून, युद्धाचा भडका वाढला तर ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे.
इस्रायल आणि ‘हमास’ यांच्यामध्ये चर्चेतून तोडगा निघावा, यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मध्यस्थांकडून नव्याने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. इस्रायलने युद्ध थांबवावे, अशी प्रमुख मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर, नेतान्याहू यांच्याविरोधात रविवारी आंदोलन करण्यात आले. यामध्ये आंदोलकांनी मुख्य महामार्गांबरोबरच लोकप्रतिनिधींच्या घरांसमोरील रस्ते रोखून धरले होते. हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या इस्रायली नागरिक आणि ओलिसांचे प्रतीक म्हणून गाझाच्या सीमेजवळ १५०० काळे व पिवळे फुगे घेऊन आंदोलक जमा झाले होते. ‘या हल्ल्यांना नऊ महिने पूर्ण झाली, तरीही आमच्या सरकारमधील कोणी जबाबदारी घेतलेली नाही,’ असा आरोप हन्नाह गोलान या महिला आंदोलकाने केला.
इस्रायलचे हल्ले सुरूच
गाझा पट्टीमध्ये चकमकी सुरूच असून, इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. गाझाच्या मध्य भागात एका घरावर झालेल्या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला; तर पश्चिम गाझा पट्टी शहरातील हवाई हल्ल्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, लेबेनॉनमधील दहशतवादी संघटना हिज्बुल्लाने रविवारी इस्रायलच्या उत्तर भागात २० रॉकेट डागले.
राफाह शहरात भयाण शांतता
राफाह : इस्रायली लष्कराने राफाह शहरामध्ये सुरू केलेल्या कारवाईला दोन महिने पूर्ण झाली आहेत. दोन महिन्यानंतर आता राफाह शहरामध्ये भयाण शांतता असून, सर्वत्र गोळ्यांनी चाळणी झालेल्या भिंती, काचा फुटलेल्या खिडक्या, पडलेल्या इमारतींचे ढिगारे दिसत आहेत. राफाह शहरामध्ये सर्वत्र भयाण शांतता दिसत आहे. इस्रायली कारवाईची व्याप्ती वाढत असताना २० लाखांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिकांनी या शहरामध्ये आसरा घेतला होता. आता खूप थोडे नागरिक शहरामध्ये दिसून येत आहेत. इस्रायली लष्करांने आंतरराष्ट्रीय पत्रकारांना रविवारी राफाह शहरात निमंत्रित केले होते.