हल्ला नियोजित असल्याची माहिती
दहशतवाद्यांनी केलेला हा नियोजित हल्ला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाचे पथक मच्छेडी परिसरात शोध मोहीम राबवत होते. हे दहशतवाद्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी हल्ल्याचे नियोजन केले असल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांनी अचानक हल्ला करत मोठ्या प्रमाणात गोळीबार केला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अधिक सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे.
दहशतवाद्यांनी ग्रेनेडने केला हल्ला
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर ग्रेनेडने हल्ला केला आहे. कठुआच्या डोंगराळ रस्त्यांवरून लष्कराची वाहने जात होती. त्याच वेळी वाहनावर ग्रेनेड फेकण्यात आले. हल्ल्याची माहिती मिळताच लष्कराच्या तुकडीने आणि पोलिसांच्या पथकाने आजूबाजूच्या परिसराला वेढा घातला आहे. त्याचबरोबर जवळपासच्या लष्कराच्या चौक्यांनाही अलर्ट मोडवर ठेवण्यात आले असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे.
6 दहशतवाद्यांना घातले कंठस्नान
जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या भागांमध्ये दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक झाली होती. त्यामध्ये 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. त्यानंतर आज पुन्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या चकमकीत एका पॅरा-ट्रुपरसह दोन जवान शहीद झाले असून आणखी एक जवान जखमी झाला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदरगाम चकमकीच्या ठिकाणाहून दोन दहशतवाद्यांचे तर चिन्निगाम चकमकीच्या ठिकाणावरून चार दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या महिन्यात, रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. ज्यामुळे ती खड्ड्यात पडली आणि नऊ जण ठार झाले. यानंतर काही दोन सशस्त्र दहशतवादी एका गावात घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. तेव्हा सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि त्यात एक जवान शहीद झाला.