मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणानी सतर्कता बाळगावी

रायगड जिमाका दि. 8 – रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच पुढील काही तास अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून सर्व शासकीय यंत्रणांनी अत्यंत सतर्क रहावे. ज्या संवेदनशील ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक आहे, अशा ठिकाणाहून तात्काळ नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे अशा सूचना महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या मुसळधार पाऊस व देण्यात आलेला पावसाचा इशारा या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडून जिल्ह्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात एकूण 103 गावे धोकादायक क्षेत्रात येतात. यापैकी 9 गावे अति धोकादायक, 11 मध्यम तर 83 गावे धोकादायक असल्याचे भू वैज्ञानिक सर्वेक्षणचा अहवाल आहे. या सर्व क्षेत्रातील यंत्रणानी या काळात दक्ष रहावे. दरडग्रस्त भागातील ज्या ठिकाणी स्थलांतराची आवश्यकता आहे त्या ठिकाणी तात्काळ स्थलांतर करावे.  पावसामुळे बाधित नागरिकांचे मंगलकार्यालये, मोठी सभागृहे, शाळा, आदी सुरक्षित ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर करावे. त्यांना निवारा अन्न, शुध्द पेयजल, अशा सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश कु. तटकरे यांनी यावेळी दिले. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरु नये यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी योग्य माहिती जनतेला द्यावी. आपत्ती नियंत्रणसाठी आवश्यकती सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या काळात नागरिकांनीही प्रशासनाच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद द्यावा असे आवाहन मंत्री कु तटकरे यांनी रायगड जिल्हावासियांना केले आहे.

000000

Source link

Comments (0)
Add Comment