हायलाइट्स:
- आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ
- राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
- आमदारांना आता चार कोटींचा निधी उपलब्ध होणार
मुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी तीन कोटी रुपयांवरून चार कोटी रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केली.
आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी करण्याचा निर्णय घेताना भविष्यात यात आणखी वाढ करण्याचा शब्द अजित पवार यांनी सभागृहात दिला होता. हा शब्द अजित पवार यांनी पाळला असून आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची भरघोस वाढ केली आहे, त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी चार कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.
विधानसभेतील २८८ आणि विधान परिषदेतील ६२ अशा एकूण ३५० आमदारांना ३५० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व आमदारांना मिळून आता प्रत्येक वर्षी एकूण १४०० कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी मिळणार आहे.
दरम्यान, राज्याच्या इतिहासातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीतील वाढीची आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. त्याचबरोबर आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून, प्रत्येकी एक कोटीचा निधी करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी खर्च करण्यास आमदारांना परवानगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.