जोडप्याच्या आत्महत्येनंतर दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पाटण्यात राहणारा हरीश बगेश आणि गोरखपूरमध्ये राहणारी संचिता श्रीवास्तव वाराणसीतील शाळेत शिकले होते. अकरावीत असताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक वर्ष दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर ते विवाब बंधनात अडकले. मग दोघे मुंबईला आले. हरीशनं एमबीए केलं होतं. त्यानंतर तो एका खासगी बँकेत नोकरी करु लागला.
काही दिवसांनंतर संचिताची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिचे वडील आणि गोरखपूरमधील प्रसिद्ध डॉक्टर रामचरण दास तिला घरी घेऊन गेले. तिथेच तिच्यावर उपचार सुरु होते. पत्नीची काळजी घेण्यासाठी हरीशनं बँकेतील नोकरी सोडली. तो गोरखपूरला गेला. बरेच महिने तो सासरवाडीत राहून पत्नीची काळजी घेत होता.
हरीशनं बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले. त्याची शोधाशोध सुरु होती. पण पदरी निराशा पडली. त्याला नोकरीच मिळाली नाही. दोन दिवसांपूर्वी हरीश त्याच्या सासरवाडीतून निघाला. पाटण्याच्या घरी जात असल्याचं त्यांना सांगितलं. पण तिथे जाण्याऐवजी तो वाराणसीला गेला. कुटुंबियांनी त्याला फोन केले. पण त्यानं प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर कुटुंबीय त्याला शोधत वाराणसीतील सारनाथला पोहोचले. तिथे एका होम स्टेमध्ये हरीशचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थे सापडला.
हरीशनं आत्महत्या केल्याचं समजताच त्याचे सासरे आणि डॉक्टर रामचरण दास वाराणसीला जाण्यास निघाले. हरीशच्या आत्महत्येबद्दल संचितला समजलं. पती निधनाचं दु:ख तिला पचवता आलं नाही. तिनं छतावरुन उडी मारत जीव दिला. सारनाथमध्ये आयुष्य संपवलेल्या हरीशची ओळख त्याच्या आधार कार्डवरुन पटली. पोलिसांनी हरीशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. नोकरी मिळत नसल्यानं हरीश तणावाखाली होता. तो व्यसनाच्या आहारी गेला होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.