आरोग्याला धोका?
सहा दुचाकीस्वारांच्या गटातील दोन जण उष्ण हवामान असतानाही बॅडवॉटर बेसिनमधून जात होते. संबंधित मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. दुसऱ्या दुचाकीस्वाराला उन्हाच्या झळा लागल्याने लास वेगास येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे नॅशनल पार्कच्या निवेदनात म्हटले आहे. इतर चार जणांवर घटनास्थळी उपचार करण्यात आले. नॅशनल पार्कचे अधीक्षक माइक रेनॉल्ड्स म्हणाले, ‘अशा उष्ण वातावरणात आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.’
उष्णतेच्या झळांनी अमेरिकेची होरपळ
गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेच्या झळांनी अमेरिका होरपळत असून, तापमानाचे विक्रम मोडीत काढल्याने हा मृत्यू झाला आहे. संपूर्ण अमेरिकेत यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढणारी उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पश्चिमेकडील काही भागात धोकादायक तापमानवाढ होणार असून, पूर्वेला संपूर्ण आठवडाभर उष्ण आणि दमट हवामान असेल, असे तज्ज्ञांनी रविवारी सांगितले.
हवामानशास्त्रज्ञ ब्रायन जॅक्सन म्हणतात…
अतिउष्णतेमुळे सुमारे ३.६ कोटी लोकांवर परिणाम झाला आहे, असे राष्ट्रीय हवामान सेवेमधील हवामानशास्त्रज्ञ ब्रायन जॅक्सन यांनी सांगितले. पश्चिम आणि पॅसिफिक वायव्य भागात बाराहून अधिक ठिकाणी मागील उष्णतेचे विक्रम मोडले आहेत, असे ते म्हणाले.
प्रमुख शहरांमधील तापमान (सेल्सिअस)
– उत्तर कॅलिफोर्निया : ४३.३
– रेडिंग : ४८.३
– लास वेगास : ४८.३
– पूर्व कॅलिफोर्निया : ५३.३
भारताची काय स्थिती?नवी दिल्ली : देशाच्या वेगवेगळ्या भागांत एक मार्च ते २० जून या कालावधीत उष्माघाताने १४३ जणांचा मृत्यू झाला असून, अंदाजे ४१,७८९ जणांना उष्माघाताचा त्रास झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (एनसीडीसी) उष्णतेशी संबंधित आजार आणि मृत्यूच्या पाहणीअंतर्गत संकलित केलेल्या आकडेवारीत राज्यांकडून अद्ययावत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. सर्वाधिक ३५ बळी उत्तर प्रदेशात गेले असून, दिल्लीत २१; तर बिहार आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी १७ बळी गेले आहेत.