Maharashtra Police: CM ठाकरे यांचा मोठा निर्णय; पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न पूर्ण!

हायलाइट्स:

  • पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न पूर्ण
  • विजयादशमीनिमित्त पोलिसांना मिळाली ‘गुड न्यूज’
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय.

मुंबई: राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्त्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते पण पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट फायदा येत्या काही महिन्यांत सुमारे ४५ हजार हवालदार, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांना होणार असून विजयादशमीच्या मुहूर्तावर या बातमीमुळे हजारो अंमलदारांच्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होणार आहे. ( Maharashtra Scrapping Police Naik Rank )

वाचा:गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका; ‘या’ प्रकरणात कारवाई

शासनाच्या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातील अंमलदारास कमी कालावधीत पदोन्नतीच्या ३ संधी कमी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी मोठ्या संख्येने मिळाल्याने एकीकडे पोलीस अधिकाऱ्यांची गरज भागेल तसेच पोलीस दलामध्ये पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या तपासी अंमलदारांच्या सध्याच्या संख्येमध्येही भरीव वाढ होणार आहे. याशिवाय पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या पदोन्नती साखळी मधील पोलीस नाईक या संवर्गाची पदेही व्यपगत (रद्द) होतील.

वाचा:‘कुणी तुमच्या खिशात पुडी टाकून तुम्हाला अटक करेल’; पवारांचा एनसीबीवर हल्लाबोल

पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या पातळीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाने यासंदर्भातील प्रस्तावावर गेल्या सहा महिन्यांपासून काम सुरू होते. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात यावी व शासन निर्णयही निर्गमित करण्यात यावा, अशा सूचना देऊन हा प्रस्ताव आज मंजूर केला. मुळातच या प्रस्तावाचा उद्देश हा पोलीस शिपाई पदावरील व्यक्तीस पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहचवणे आणि पर्यायाने पोलिसांचे मनोधैर्य व आत्मबल वाढून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणे असा आहे. या निर्णयामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनकरिता मोठ्या संख्येने गुन्हे कामकाजाच्या तपासासाठी अंमलदार मिळणार असून गुन्ह्यांच्या तपासात तसेच दोष सिद्ध करण्याच्या कामांत लक्षणीय वेग येणार आहे.

वाचा: ‘पवारांचा तो आरोप हास्यास्पद; ५० वर्षे राजकारणात असूनही…’; पाटलांची टीका

बढतीची दीर्घ प्रतीक्षा आता संपली

या निर्णयामुळे आता पोलीस शिपायांना त्यांच्या सरासरी ३५ वर्षांच्या सेवाकालावधीमध्ये पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त होता येईल. पोलीस शिपायांना सर्वसाधारण १२ ते १५ वर्षानंतर पदोन्नती मिळत असल्यामुळे त्यांचे मनोबल कमी होवून त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतो. पोलीस अंमलदारांना पदोन्नती साखळीमध्ये पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशा तीन पदोन्नतीच्या संधी मिळतात. सर्वसाधारणपणे एका पदावर १० वर्षे सेवाकालावधीनंतर पदोन्नती मिळायला पाहिजे पण वरच्या श्रेणीतील पदसंख्या कमी असल्यामुळे अपेक्षेपेक्षा दीर्घ कालावधी लागतो. सध्या सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या पदावर ३ वर्ष सेवा पूर्ण होण्याआधीच काही जण सेवानिवृत्त होतात, किंवा काही अंमलदार हे पोलीस हवालदार पदावरूनच सेवानिवृत्त होतात. अशा अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नतीची संधी मिळत नाही. त्यांना या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे.

गुन्हे रोखण्यासाठी मोठी मदत

या निर्णयामुळे गुन्ह्यांची उकल होण्यास तसेच सामान्य नागरिकांची मदत घेण्यात अधिक सुलभता येऊन पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यास मदत तर होणारच आहे शिवाय पोलीस दलास सद्यस्थितीत प्रत्यक्ष कामकाजाकरिता मिळणाऱ्या सुमारे २३ कोटी इतक्या मानवी दिवसामध्ये सुमारे ६६ कोटी दिवस इतकी वाढ होईल आणि गुन्हे उघडकीस येण्याच्या व रोखण्याच्या प्रमाणामध्ये निश्चितच भरीव वाढ होईल. संख्यात्मक वाढीत सांगायचे तर पोलीस दलामध्ये सध्याच्या ३७ हजार ८६१ पोलीस हवालदारांची संख्या ५१ हजार २१० होणार असून १५ हजार २७० सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची संख्या १७ हजार ७१ होणार आहे. एकंदर १५ हजार १५० अतिरिक्त तपासी अंमलदार उपलब्ध होवून, प्रत्येक पोलीस स्टेशनकरिता १३ अतिरिक्त अंमलदार मिळणार आहेत.

वाचा: आर्यनचा कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर २० ऑक्टोबरला फैसला

Source link

maharashtra police latest newsmaharashtra scrapping police naik rankpolice constable sub inspector newsuddhav thackeray latest newsuddhav thackeray on maharashtra policeउद्धव ठाकरेदिलीप वळसे-पाटीलपोलीस उपनिरीक्षकपोलीस शिपाईपोलीस हवालदार
Comments (0)
Add Comment