कथुआतील बदनोटा भागात लष्कराच्या गस्ती पथकावर सशस्त्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सोमवारी पाच जवानांना वीरमरण आले होते, तर अन्य पाच जवान जखमी झाले होते. पाच हुतात्मा जवानांचे पार्थिव शवविच्छेदनानंतर लष्कराच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर ते अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले.
‘बदनोटा, कथुआ (जम्मू आणि काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या लष्करातील पाच वीर जवानांच्या मृत्यूने मला अतीव दु:ख झाले आहे. त्यांच्या शोकाकूल कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना. या कठीण काळात राष्ट्र त्यांच्यासोबत उभे आहे. दहशतविरोधी मोहीम सुरू आहे आणि या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आमचे सैनिक कटिबद्ध आहेत,’ असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘एक्स’वर जाहीर केले.
दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम तीव्र
कथुला जिल्ह्यात लष्कराच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या शोधासाठी परिसरात व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेवर देखरेख करण्यासाठी पोलिस महासंचालक आर. आर. स्वैन हे विमानाने येथे दाखल झाले आहेत. त्यांनी हा परिसराची हवाई पाहणी केली, तसेच शोधमोहिमेचा आढावा घेतला. शोधमोहिमेची व्याप्ती उधमपूर जिल्ह्यातील बसंतगढ, सेओज तसेच कथुआमधील बानी, डग्गर, किंडलीपर्यंत वाढवण्यात आली आहे. लष्कराच्या विशेष ‘पॅरा’ युनिटचे जवान विशिष्ट भागात तैनात करण्यात आले आहेत.
हेलिकॉप्टर आणि यूएव्ही पाहणीसह जमिनीवर शोधमोहीम सुरू आहे. घनदाट जंगलावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी श्वानपथक, मेटर डिटेक्टरचा वापर करण्यात येत आहे. लष्कर, पोलिस, सीआरपीएफ यांच्या सहभागाने संयुक्त शोधमोहीम राबवली जात आहे.