शक्कल लढवणारे शिक्षक हे तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यातील आनंदपूर मंडळ परिषदेच्या माध्यमिक शाळेत शिकवत असून त्यांचे नाव आहे रविंद्र. त्यांनी मुलांच्या मनातील भूताचे भय दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि त्यांना तर्काने विचार करण्यास प्रोत्साहित केले. पण विद्यार्थ्यांनी काही भूत नसल्याचे मानले नाही. उलट विद्यार्थ्यांनीच आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारले की, शाळेतील ५ वीच्या वर्गखोलीत कोणी नसताना आवाज येतच कसा होता? ५ जुलैला अमावस्येच्या दिवशी तुम्ही त्याच खोलीत राहून दाखवा.
याचदिवशी त्वरित रविंद्र (शिक्षक) आणि विद्यार्थ्यांमध्ये एक छुपी पैज लागली. याची शिक्षक विद्यार्थी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही कानोकान खबर नव्हती. आपल्या प्लॅननुसार, रविंदर बेडशीट आणि टॉर्च घेऊन त्याच रात्री शाळेत आले आणि ते ५ वीच्या वर्गात गेले, विद्यार्थ्यांनी त्यांना तसे जाताना पाहिले.
रात्र सरली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मुलं त्याच वर्गाबाहेर उभी होती आणि इतक्यात दार उघडलं आणि पाहतात तर काय रविंदर मास्तर त्यांच्यासमोर जिवंत अवस्थेत उभे होते. यामुळे विद्यार्थ्यांना सुखद धक्का बसला आहे. आणि शिक्षक रविंदर यांचीही चिंता मिटली आहे. रविंदर सांगतात की, सकाळी जेव्हा मुलांनी मला सुरक्षित स्वरुपात पाहिले तेव्हा त्यांनी भूत नसतात हे मान्य केलं आहे. शाळेत ८७ विद्यार्थी असून गेल्या वर्षी शाळेच्या इमारतीत भूत असल्याची भीती विद्यार्थ्यांध्ये पसरली होती. यामुळे काही विद्यार्थी ही शाळा सोडून खासगी शाळेत दाखल झाले होते. परंतु रविंदर यांनी अशा कृती आजमावून विद्यार्थ्यांच्या मनातील भय दूर केले आहे. यामुळे पालकांचीही चिंता मिटली आहे. रविंदर यांच्या या कृतीचे शाळेत कौतुक होत आहे.