एड्स नियंत्रण सोसायटीच्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत ८२८ विद्यार्थ्यांना HIV झाला आहे. ज्यातील ४७ जणांचा मृत्यू झाला असून अन्य ५७२ विद्यार्थी अद्याप जिवंत आहेत आणि यातील काही विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी त्रिपुराच्या बाहेर गेले आहेत. यापेक्षा गंभीर म्हणजे सोसायटीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील २२० शाळा आणि २४ कॉलेज अशी आहेत जेथील विद्यार्थी अंमली पदार्थाचे सेवन करतात.
त्रिपुरा राज्यातील HIVचे आकडे भीती दायक आहेत. राज्यातील तरुण फक्त ड्रग्स घेत नाहीत तर अंमली पदार्थाचे सेवानामुळे एचआयव्ही बाधित होत आहेत. त्रिपुरा पत्रकार संघ आणि वेब मीडिया फोरम यांच्या एका कार्यक्रमात एड्स नियंत्रण सोसायटीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात रोज एचआयव्हीचे ५ ते ७ प्रकरणे समोर येत आहेत. आतापर्यंत ४७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मे २०२४ पर्यंत एआरटी केंद्रांवर उपचारासाठी ८ हजार ७२९ लोकांनी नोंदणी केली आहे. एचआयव्ही झालेल्या एकूण लोकांची संख्या ५ हजार ६७४ इतकी आहे. ज्यात ४ हजार ५७० पुरुष तर १ हजार १०३ महिलांचा समावेश आहे. धक्कादायक चित्र असे आहे की, यातील अधिक तर रुग्ण तरुण आहेत. ज्यात ८२८ शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले. ही आकडेवारी राज्यातील १६४ हेल्थ सर्व्हिस सेंटरमधून घेतली आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या प्रकरणांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना एचआयव्हीची लागण झाली आहे, त्यातील अधिकतर मुले ही श्रीमंत कुटुंबातील आहेत. त्याचे आई-वडील नोकरी करतात. अशा मुलांकडे अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी भरपुर पैसे असतात. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्रिपुरा उच्च न्यायालयाने एनडीपीएस अधिनियमानुसार पकडण्यात आलेल्या आरोपींच्या आई-वडिलांना सामाजिक सेवा करण्याचे आदेश दिले. त्याच बरोबर गावात एक महिना अंमली पदार्थ विरोधी अभियान चालवण्यास सांगितले गेले होते.