‘ट्राइन विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी साई सूर्या अविनाश गड्डेच्या मृत्यूबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. न्यूयॉर्कच्या अल्बानीमधील बार्बरविले धबधब्यात बुडाल्यानं ७ जुलैला त्याचा मृत्यू झाला आहे’ अशी माहिती दुतावासानं एक्स पोस्टच्या माध्यमातून दिली. ‘मृताच्या कुटुंब आणि मित्र परिवारासोबत आमच्या सहवेदना आहेत. विद्यार्थ्याचं पार्थिव भारतात पाठवण्यासाठी आम्ही हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहोत,’ असं दुतावासानं पोस्टमध्ये पुढे म्हटलं.
अविनाश गड्डे मूळचा तेलंगणाचा रहिवासी आहे. त्यानं २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षात इंडियाना राज्यातील ट्राइन विद्यापीठात प्रवेश घेतला होता. तसा उल्लेख त्याच्या लिंक्डइन प्रोफाईलमध्ये आहे. अविनाश ४ जुलैला अल्बानीमध्ये पोहोचला होता. सुट्टी घालवण्यासाठी, फिरण्यासाठी अविनाश अल्बानीला गेला होता. रविवारी तो बार्बरविले धबधबा पाहण्यासाठी गेला. पाण्यात बुडाल्यानं त्याचा मृत्यू झाला. धबधब्याजवळ त्यानं एक फोटो काढला होता. तो त्याचा अखेरचा फोटो ठरला.
‘रविवारी बार्बरविले धबधब्यात दोन जण बुडाले. एकाला वाचवण्यात यश आलं. पण दुसऱ्याचा जीव वाचू शकला नाही. ज्याचा जीव वाचला, तो पोहण्यात पटाईत होता. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तो या परिसराचा रहिवासी नव्हता’, अशी माहिती रेनसीलेर काऊंटी शेरिफ यांच्या कार्यालयानं दिली. अविनाश गड्डेच्या मृत्यूमुळे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीयांच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांचा विषय चर्चेत आला आहे.
अमेरिकेत राहून शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रमाण मोठं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे. गेल्याच महिन्यात ३२ वर्षीय दसारी गोपीकृष्णची अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एका दुकानात हत्या झाली. एका दुकानात लूटमार सुरु असताना गोळीबार झाला. त्यात दसारी यांचा मृत्यू झाला. गोपीकृष्ण यांना अमेरिकेला जाऊन वर्षही झालं नव्हतं. अमेरिकेत या वर्षात सहापेक्षा अधिक भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.