राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व मागील वर्षी रद्द झाले व नंतर विजेच्या वेगाने त्यांचा बंगलाही त्यांच्याकडून काढून घेण्यात आला. तेव्हापासून ते त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्यासह १०-जनपथ याच बंगल्यात वास्तव्यास आहेत. राजीव गांधी कुटुंबाचा हा पारंपारिक बंगला मानला जातो. राहुल गांधी यांचे अधिकृत कार्यालयही येथेच असून याच्या शेजारीच २४ अकबर रस्ता, हे काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्यालय आहे. काँग्रेसचे नवीन मुख्यालय कोटला मार्गावर (दीनदयाळ उपाध्याय रस्त्याची मागील बाजू) तयार आहे. मात्र पक्षाने तेथे अजूनही आपले मुख्यालय हलविलेले नाही.
राहुल गांधी तब्बल १९ वर्षे तुघलक लेनमधील निवासस्थानी वास्तव्यास होते. गुजरातमधील सुरत न्यायालयाने मागच्या वर्षी राहुल गांधी यांना मानहानीच्या एका प्रकरणात दोषी ठरवून २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द केले होते. पाठोपाठ हा बंगलाही त्यांच्याकडून हिसकावण्यात आल्यानंतर त्यांनी १०-जनपथ व काँग्रेस मुख्यालयातून लोकसभा प्रचाराची सारी सूत्रे हलविली. राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व पुन्हा बहाल झाल्यानंतर ८ ऑगस्ट रोजी पुन्हा तो बंगला देऊ केला होता.
मात्र मूक निषेध म्हणून म्हणून गांधी यांनी तो नाकारला होता. तब्बल १९ वर्षे वास्तव्य असलेले हे घर सोडण्यास भाग पाडले गेल्यावर राहुल यांनी सांगितले होते की- आपल्याला सत्य बोलण्याची शिक्षा झाली आहे. भारतातील जनतेने दिलेले हे घर हिसकावून घेतले त्यामुळे आपल्याला तेथे परत जायची इच्छा नाही. संपूर्ण भारत माझे घर आहे असेही गांधी यांनी सांगितले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने लक्षणीय कामगिरी करत एकूण विशाल पाटील व पप्पू यादव यांच्यासह १०२ खासदार निवडून आणले. नरेंद्र मोदी सरकारने बहुमत गमावले. दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडियाचे लोकसभेतील संख्याबळ २०१९ च्या तुलनेत दुपटीने वाढून अल्पमतातील भाजपच्या २४० या खासदार संख्येच्या जवळ पोहोचले. लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीमुळे १०-जनपथ या निवासस्थाबाबत राहुल गांधी व त्यांच्या टीमच्या मनात वेगळाच विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच १२ तुघलक लेन तसेच गुरुद्वारा रकाबगंज लेनमधील बंगले पुन्हा घेण्याबाबत गांधी यांच्या अनुत्सुकतेकडे वरील पार्श्वभूमीवर पाहिले जाते.
राहुल व प्रियंका गांधी यांनी ७- सफदरजंग लेन येथील बंगल्याचीही पाहणी काही दिवसांपूर्वी केली होती. हा बंगला पूर्वी महाराजा रणजित सिंह यांच्याकडे होता. याच्याच शेजारच्या ८ क्रमांकाच्या बंगल्यात दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे वास्तव्य अनेक वर्षे होते. त्यांनीही २०१९ च्या निवडणुकीनंतर ते घर तत्काळ सोडले होते.