काँग्रेसने म्हटले आहे की घटनात्मक पदावर राहिलेल्या व्यक्तीबद्दल अशी हीन टीका करुन मोदी यांनी सर्व संसदीय नियम तर पायदळी तुडवलेच पण निवडणुकीच्या प्रचारानंतर बाकी राहिलेली पदाची थोडीफार प्रतिष्ठाही त्यांनी धुळीसा मिळवली आहे. माजी उपराष्ट्रपती अन्सारी ऑगस्ट २००७ ते ऑगस्ट २०१७ या दहा वर्षांच्या काळात राज्यसभेचे सभापतीही होते.
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की `कितीही संख्याबळाचा दावा केला तरी २०१४ मध्ये आम्ही सत्तेत आलो तेव्हा राज्यसभेत आमची संख्या ४० होती. फारच कमी संख्या होती आणि (तत्कालीन) सभापतींचाही कल दुसरीकडे होता. पण आम्ही अभिमानाने देशसेवा करण्याच्या आमच्या संकल्पापासून मागे हटलो नाही. मोदी यांनी २ जुलै रोजी केलेल्या या भाषणावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ८ जुलै रोजी म्हणजे ६ दिवसांनी आपला विरोध व्यक्त केला.
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना लिहिलेल्या पत्रात रमेश यांनी म्हटले की, आतापावेतो देशाच्या कोणत्याही पंतप्रधानांनी संसदीय सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांवर मोदींप्रमाणे हल्ला केला नाही. उपराष्ट्रपती म्हणून अन्सारी हे राज्यसभेचे सभापती होते. अन्सारी हे विरोधकांकडे झुकल्याचा आरोप करून पंतप्रधान मोदींनी संसदेची सर्व मर्यादा मोडीत काढल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मोदींनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी अंसारी यांच्याकडील त्यांचा इशारा सुस्पष्ट होता. ते जे म्हणाले ते अत्यंत भयानक आणि अस्वीकार्य होते. त्यांचे उद्गार ताबडतोब कामकाजातून काढून टाकायला हवे होते, असे रमेश यांनी पत्रात म्हटले आहे.
मोदींनी हमीद अन्सारी यांच्यावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. सात वर्षांपूर्वी अन्सारी यांच्या निवृत्तीच्या निरोपाच्या भाषणातही त्यांनी अन्सारींच्या उच्चपदांवरील राजनैतिक नियुक्त्यांकडे बोट दाखविले होते. अंसारी यांनी उपराष्ट्रपतीपदी निवड होण्याआधी अनेक इस्लामिक देशांमध्ये विदेश व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी म्हणून काम केले, याबाबत मोदी यांनी सूचक इशारा केला होता. अंसारी हे ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त आणि न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर भारतीय परराष्ट्र सेवेमधून निवृत्त झाले होते. परंतु याकडे चुकीच्या पद्धतीने दुर्लक्ष करण्यात आले, असाही आरोप जयराम रमेश यांनी या पत्रात केला.