मला सापानं कायम शनिवारी किंवा रविवारी दंश केला आहे. सापानं ज्यावेळी मला तिसऱ्यांदा दंश केला, तेव्हा त्याच रात्री तो माझ्या स्वप्नात आला. मी तुला नऊवेळा दंश करेन. तू आठवेळा वाचशील. पण नवव्यावेळी तुला कोणतीही शक्ती, तांत्रिक, डॉक्टर वाचवू शकणार नाही. मी तुला माझ्या सोबत घेऊन जाईन, असं साप मला म्हणाला होता, असं विकासनं सांगितलं.
२४ वर्षांचा विकास दुबे फतेहपूरच्या मलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सौरा गावात राहतो. ‘३५ दिवसांमध्ये मला सहावेळा सापानं दंश केला आहे. सर्पदंश होण्याआधी प्रत्येकवेळी मला धोक्याची चाहूल लागते. शनिवार, रविवारीच साप दंश करतो. तीनवेळा दंश केल्यानंतर डॉक्टरांनी मला घर सोडून अन्यत्र राहण्यास सांगितलं. मी माझ्या मावशीकडे राहायला गेलो. तिथेही सापानं मला दंश केला. मग मी काकांकडे गेलो. तिथेही सापानं दंश केला,’ असा घटनाक्रम विकासनं सांगितला.
सर्पदंश होण्याच्या दिवशीच मला चाहूल लागते. आज मला साप दंश करणार असल्याचं मी घरात सगळ्यांना सांगतो. साप नुकताच माझ्या स्वप्नात येऊन गेला. मी आणखी तीनवेळा तुला चावेन. नवव्यांदा तुझा जीव जाईल. तुला कोणीही वाचवू शकणार नाही, असं सापानं म्हटल्याचं विकासनं सांगितलं. विकास आणि त्याचे कुटुंबीय सध्या चिंतेत आहेत. माझं आयुष्यमान कार्ड तयार करा आणि आर्थिक मदत द्या, अशी मागणी त्यानं केली आहे.
विकासला सर्वप्रथम २ जूनला रात्री ९ च्या सुमारास सापानं दंश केला. त्याच्यावर एका खासगी नर्सिंग होममध्ये उपचार झाले. तो २ दिवस रुग्णालयात होता. यानंतर १० जून, १७ जून, २१ जूनला सापानं विकासला दंश केला. यानंतर तो मावशीच्या घरी गेला. तिथेही त्याला साप चावला. मग तो काकांच्या घरी पोहोचला. तिथेही सापानं त्याला दंश केला. त्यामुळे विकासचं कुटुंब दहशतीत आहे.