मणिपूर दौऱ्यावरून परतल्यानंतर राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला. ‘मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा मुद्दा काँग्रेस आणि ‘इंडिया’तील घटकपक्ष एकत्रितपणे संसदेत पूर्ण ताकदीने मांडतील’, असे त्यांनी यात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वैयक्तिकरित्या मणिपूरला भेट देण्याचा सल्ला त्यांनी यानिमित्त पुन्हा दिला. ‘पंतप्रधान मोदींनी स्वतः येथे येऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घ्याव्यात, परिस्थिती पाहावी आणि शांततेचे आवाहन करावे’, असे राहुल म्हणाले.
आजही परिस्थिती सुधारली नाहीये, मोदीजी आपण भेट द्या
गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारात किमान २०० जण मारले गेले. अनेक घरे आणि सरकारी इमारती जाळल्या गेल्या, तर हजारो नागरिक विस्थापित झाले. ‘आजही मणिपूरमध्ये घरे जळत आहेत. हजारो निष्पाप मणिपुरींचे जीव धोक्यात आहेत. दुर्दैवाने आजही तेथील परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. आज या राज्याचे दोन तुकडे झाले आहेत. हजारो कुटुंबे असहाय होऊन मदत छावण्यांमध्ये राहत आहेत’, असे राहुल म्हणाले.
राहुल गांधी यांची तिसऱ्यांदा मणिपूरला भेट
मणिपूरच्या एक दिवसीय भेटीत राहुल यांनी भाजपशासित राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील तीन मदत शिबिरांना भेट दिली आणि हिंसाचारामुळे प्रभावित आणि विस्थापित झालेल्या मैतेई आणि कुकी या दोन्ही गटांतील नागरिकांशी संवाद साधला. मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर राहुल यांनी गेल्या वर्षी ३ मे रोजी मणिपूरला भेट दिली होती. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये त्यांनी याच राज्यातून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू केली होती.