आर्मी मेडिकल कोर २६ वी बटालियन पंजाब रेजिमेंटचे कॅप्टन अंशुमन सिंह यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात एका भीषण आगीतून काही जणांची सुटका करताना प्राणांचे बलिदान दिले होते. यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ५ जुलै रोजी शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांना कीर्ति चक्राने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृति सिंह आणि वीरमाता मंजू देवी सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
आई-वडिलांचे सुनेवर गंभीर आरोप
आता अंशुमन यांच्या आई-वडिलांनी सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. मुलगा शहीद झाला, पण आम्हाला काहीच मिळाले नाही. सुनेने सन्मान आणि सानुग्रह रक्कम हे दोन्ही काढून घेतले आणि ती माहेरी निघून गेली. आमचा मुलगाही गेला आणि आता सूनही निघून गेली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
नेक्स्ट टू किनच्या निकषात बदलांची मागणी
शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांचे वडील रवी प्रताप सिंह म्हणाले की, त्यांना NOK (नेक्स्ट टू किन) अंतर्गत निश्चित केलेल्या निकषांमध्ये बदल अपेक्षित आहे. यासाठी त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही कळवले आहे. याशिवाय दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींसोबत झालेल्या भेटीतही त्यांनी यात बदलाची इच्छा व्यक्त केली होती.
उरल्या केवळ आठवणी
आमच्या मुलाचे जेमतेम पाच महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांना मूलबाळही नाही, पण आता आमच्याकडे मुलाच्या फोटोशिवाय काहीही उरले नाही, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांची सून आता त्यांना सोडून गेली आणि तिने आपला पत्ताही बदलला आहे. वडिलांनी सांगितले की, भले कीर्तिचक्र स्वीकारताना त्यांची पत्नी (शहीद अंशुमन यांची आई) सोबत होती, पण आता आमच्या मुलाच्या पेटीवर ठेवण्यास आमच्याकडे काहीच नाही. आमच्यासोबत जे घडलं, ते कोणाच्याही बाबतीत होऊ नये, असंही ते म्हणाले.