८१ वर्षीय बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत वयस्कर अध्यक्ष आहेत. बायडेन व ट्रम्प या अध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये झालेल्या वादचर्चेच्या पहिल्या फेरीत बायडेन हे निष्प्रभ ठरले, अशी टीका त्यांच्या पक्षातूनच झाली होती. बायडेन यांची लोकप्रियता ओसरली असून ट्रम्प यांना पराभूत करायचे असेल, तर पक्षाने सक्षम उमेदवार द्यायला हवा, असेही उघडपणे बोलले गेले. या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी गेल्या काही दिवसांत अतिशय आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी अध्यक्षीय निवडणुकीत पक्षाचा उमेदवार मीच असेन, याचा त्यांनी गुरुवारी पुनरुच्चार केला.
या निवडणुकीत माझा पराभव होईल असे कोणालाही वाटत नाही, तसेच कोणत्याही सर्वेक्षणातही तसे आढळलेले नाही. यामुळे ही निवडणूक पुन्हा लढवण्यावर मी ठाम आहे. ही निवडणूक लढण्यासाठी मी सर्वाधिक पात्र उमेदवार आहे असे मला वाटते. ट्रम्प यांना यापूर्वी मी एकदा पराभूत केले आहे, आता यावेळीही मी त्यांना हरवेन, असे बायडेन म्हणाले.
पक्षांतर्गत विरोधकांनादेखील त्यांनी यावेळी पुन्हा धारेवर धरले. माझ्या लोकप्रियतेचा मुद्दा आमच्या पक्षातील काही जण उपस्थित करत आहेत. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की, अमेरिकेच्या इतिहासात असे किमान पाच अध्यक्ष होऊन गेले आहेत की निवडणुकीला सामोरे जाताना त्यांची लोकप्रियता घटली होती. त्यांची लोकप्रियता माझ्यापेक्षाही कमी होती. आपल्याला प्रचाराचा बराच मोठा पल्ला अद्याप पार करायचा आहे. त्यानुसार मी मार्गक्रमण करत आहे, अशा शब्दांत त्यांनी निर्धार व्यक्त केला.
विस्मरण व नावांत गोंधळ
वयोमानामुळे नावे विसरणे अथवा चुकीची नावे घेण्याचा प्रकार बायडेन यांच्याकडून पुन्हा एकदा घडला. ट्रम्प हे पात्र नसते तर मी त्यांना उपाध्यक्ष केले नसते, असे ते या पत्रकार परिषदेत म्हणाले. वास्तविक ते उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याविषयी बोलत होते. त्यापूर्वी नाटो संमेलनात युक्रेनचे अध्यक्ष या नात्याने झेल्येन्स्की यांच्याऐवजी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख केला.
‘चीनला दुष्परिणाम भोगावे लागतील’
रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशियाला मदत करणाऱ्या चीनला याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा बायडेन यांनी यावेळी दिला. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली. पुतिन यांच्याशी चर्चा करण्याचे कोणतेही कारण सध्या तरी मला दिसत नाही. ते त्यांच्या वर्तनात बदल करत नाहीत, तोपर्यंत ते शक्य नाही, असे ते म्हणाले.
कमला हॅरीस नेतृत्वासाठी योग्य
अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस देशाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य आहेत, असे बायडेन यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. ‘सुरुवातीपासून मला याबाबत कोणतीही शंका नाही. त्या अध्यक्ष होण्यास योग्य आहेत. यासाठी मी त्यांना निवडले,’ असे ते म्हणाले.