नेमकं काय आहे प्रकरण ?
उत्तरप्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात विकास दुबे नावाचा तरुण राहतो. विकास कुठेही गेला तरी एक साप त्याचा पाठलाग करतो आणि त्याला चावतो. आत्तापर्यंत 40 दिवसांत सापाने विकासला सात वेळा चावा घेतला आहे. विकासला आतापर्यंत सात वेळा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून डॉक्टरांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे.
विकासला पडले स्वप्न
मिळालेल्या माहितीनुसार, विकासने त्याला एक स्वप्न पडल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला की, ”माझ्या स्वप्नात एक साप आला त्याने मला एकूण 9 वेळा चावणार असण्याचे सांगितले आहे. तो मला दर शनिवारी चावण्यासाठी येतो. ज्यावेळेस नवव्यांदा तो मला चावेल तेव्हा माझा मृत्यू होईल. कोणताही डॉक्टर, तांत्रिक, महाराज किंवा पंडित माझा जीव वाचवू शकणार नाही”. विकासने सांगितलेल्या या प्रकारामुळे त्याच्या कुटुंबियांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साप चावण्याआधी मिळते पूर्वकल्पना
विकास पुढे म्हणाला की, ” मला साप चावण्याच्या तीन ते चार तास आधी मला पूर्वकल्पना मिळते. मी हे माझ्या कुटुंबीयांना सांगतो आणि ते मला वाचवण्याचा प्रयत्न करतात”.
आर्थिक मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी
विकासने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून त्याला सरकारी रुग्णालयात जाऊन मोफत उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.
तीन डॉक्टरांची टीम तयार
मुख्य वैद्यकीय अधिकारी राजीव नयन गिरी यांनी अधिकची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ” विकासला अजूनही साप चावणार आहे की नाही ? हे शोधून काढायचे आहे. तसेच त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची योग्यताही पाहावी लागेल.दर शनिवारी एका व्यक्तीला साप चावला जातो आणि त्या व्यक्तीला त्याच रुग्णालयात दाखल केले जाते. तसेच तो फक्त एका दिवसात बरा होतो हे विचित्र आहे. हे गूढ उकलण्यासाठी तीन डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली आहे. हे पथक प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर उघड करेल.”