अयोध्येत दहशतवाद हल्ल्याची भीती
अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्यापासून दहशतवादी हल्ल्यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. त्यामुळे वेळीच सतर्कता म्हणून केंद्र सरकार अयोध्येच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार करत आहे. राम मंदिराचे निर्माण झाल्यापासून लाखो भाविक हे आयोध्येत दाखल होत आहेत. त्यामुळे भाविकांच्या आणि मंदिराच्या सुरक्षेसाठी एनएसजी कमांडोचे हब तयार करण्यात येणार आहे.
राम मंदिर परिसरात सुरक्षा चाचणी घेतली जाणार
एनएसजीची टीम अयोध्येत पोहोचणार आहे. राम मंदिराच्या संपूर्ण संकुलाच्या सुरक्षेचा आढावा कमांडो घेणार आहेत. तसेच जर दहशतवादी हल्ले झाले तर त्यांचा सामना कसा करता येईल या विषयी टीम संबंधित अधिकाऱ्यांशी विचारमंथन करणार आहे. रामनवमी, सावन आणि कार्तिक परिक्रमा यात्रा अशा सणांमुळे राम मंदिरात मोठी गर्दी होत असते. याच अनुषंगाने एटीएसकडे मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती. आता एसएसएफचे कमांडो राम मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहे. याशिवाय सीआरपीएफ आणि पीएसीचे जवान देखील तैनात करण्यात आले आहेत. तर यातील एसएसएफच्या जवानांना एनएसजीनेच प्रशिक्षण दिले आहे.
2005 मध्ये झाला होता दहशतवादी हल्ला
5 जुलै 2005 रोजी अयोध्येत दहशतवादी हल्ला झाला होता. राम लल्ला तंबूत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सुरक्षा दलाच्या तत्परतेमुळे हल्ल्यात सहभागी असलेले पाचही दहशतवादी मारले गेले होते. त्यामुळे राम मंदिराला कायमच धोका राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी देखील दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. याच अनुषंगाने राम मंदिर परिसराची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.