Ashadhi Ekadashi 2024 : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल…! कोण आहे विठ्ठल?

Lord Vithoba Information In Marathi :

‘पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा गजर ऐकला की डोळ्यासमोर उभा राहतो अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला विठ्ठल ! विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे दैवत. विठ्ठल या नावात तीन अक्षरे आहेत. ‘वि’चा अर्थ विधाता ब्रह्मदेव, ठ चा अर्थ निळकंठ अर्थात महादेव,ल म्हणजे लक्ष्मीकांत अर्तात श्रीविष्णू. या तीन अक्षरांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा निर्देश भक्तांना होतो, म्हणूनच बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल असे म्हणतात. संतांनी विठ्ठलाला विष्णु-कृष्णरूप मानलेला आहे.

विठ्ठलाच्या मूर्तीतील विष्णुतत्त्व जागृत होण्यासाठी मूर्तीला गोपीचंदन लावतात, त्याला तुळस वाहतात असं सांगितलं जातं. श्रुती- स्मृती- पुराणांमध्ये कोठेही विठ्ठलाचा निर्देश नाही किंवा विष्णुच्या अवतारांमध्ये आणि नामगणनेत त्याचा समावेश नाही. पण इसवीसनाच्या अकराव्या-बाराव्या शतकापासून विठ्ठलाला वैष्णवप्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. विट + ठल (स्थळ) = विठ्ठल याचा अर्थ विटेवर उभा राहतो तो विठ्ठल असंही म्हणतात.
विठ्ठल एक लोकदैवत

विठ्ठल हा मूळचा लोकदैवत आहे. तो गोपजनांचा, गवळी-धनगरांचा देव आहे. कर्नाटक- महाराष्ट्रातले गोपजन त्याला विठ्ठल-बीरप्पा या जोडनावाने संबोधतात. संत ज्ञानदेवांनी त्याला ‘कानडा’ आणि ‘कर्नाटकु’ अशी दोन्ही विशेषणे लावलेली आहेत. संत एकनाथांनी ‘तीर्थ कानडे देव कानडे। क्षेत्र कानडे पंढरीये।’ असे म्हटले आहे, तर संत नामदेवांनी ‘कानडा विठ्ठल तो उभा भीवरेतीरी’ असा त्याचा निर्देश केला आहे. संत नामदेव तर विठ्ठलाचा भाषिक निर्देशही करतात विठ्ठल कानडे बोलू जाणे। त्याची भाषा पुंडलीक नेणे।।. ‘कानडा म्हणजे अगम्य’ अशा अर्थानेही संतांनी श्रीविठ्ठलाचे उल्लेख केलेले आहेत.

‘कर्नाटकु’ या शब्दाचा कर्नाटक या प्रदेशाशी संबंध नसून ‘कर्नाटकु’ म्हणजे ‘करनाटकु’ वा ‘लीलालाधव दाखविणारा’, असेही मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे. परंतु पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे. त्याचे प्राचीन नाव ‘पंडरगे’ हे तर कानडीच आहे. म्हणून विठ्ठल हे महाराष्ट्र-कर्नाटकाच्या, तसेच आंध्र प्रदेशाच्या सांस्कृतिक एकतेचे आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. मराठी भक्तांइतकेच कानडी भक्तही विठ्ठलाला भेटायला वर्षभर येत असतात.

‘पांडुरंग’ विठ्ठलाचे संतप्रिय नाव

‘पांडुरंग’ विठ्ठलाचे संतप्रिय नाव असून हे नाव पंढरपूरपासून तयार झालेलं आहे, असं म्हणतात. पंढरपूरचे मूळ कन्नड नाव आहे ‘पंडरगे’. विठ्ठल मंदिरातील सोळखांबी मंडपातल्या तुळईवर होयसळ नृपती सोमेश्वराचा लेख (शके ११५९) आहे. त्यात या ग्रामनामाचा उल्लेख आहे. या पंडरगेपासूनच पांडुरंग हे देवनाम आणि पांडुरंग-पंढरपूर-पंढरी हे क्षेत्रनाम आणि पुंडरीक हे भक्तनाम कृत्रिम संस्कृतीकरणातून साधले गेले आहे, अशी माहिती सापडते.’अवघा प्रेमाचा पुतळा। विठ्ठल पाहा उघडा डोळा।’ असे म्हणत संतांनी विठ्ठलाचे सगुण रूप डोळे भरून पाहिले आहे.

संत तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे “तुका म्हणे जे जे बोला, ते ते साजे या विठ्ठला” या वचनापुढे नतमस्तक व्हावं लागतं. विठ्ठलाला कोणी विष्णुरूप मानलंय तर कोणी शिवरूप.. विठ्ठलाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्याला जे जे रूप प्रिय त्या त्या रुपात हा विठ्ठल त्याला दिसतो.

‘रूप पाहतां तरी डोळसु,
सुंदर पाहतां गोपवेषु ।
महिमा पाहतां महेशु,
जेणें मस्तकी वंदिला ।।’

Source link

Ashadhi Ekadashi 2024devshayani ekadashipandharpur Vitthal templeVitthalVitthala chi MurtiWari 2024कोण आहे विठ्ठल?पंढरीची वारी 2024पांडूरंगविठोबा
Comments (0)
Add Comment