महापालिका क्षेत्रात आयुष्मान भारत कार्ड नोंदणी

पुणे, दि. १९ :- आयुष्मान भारत-महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ गरजूंना मिळावा यासाठी दोन्ही महानगरपालिकांच्या क्षेत्रात आयुष्मान भारत कार्ड नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. नागरिकांनीही या योजनेचा लाभ लक्षात घेऊन कार्ड काढण्यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केले.

एकत्रित आयुष्मान भारत- महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार मेधा कुलकर्णी, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, सहायक आयुक्त धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक पी. एम. आंधळे आदी उपस्थित होते.

डॉ. शेटे म्हणाले, पुणे जिल्ह्यात ६३ लाख ६१ हजार पात्र लाभार्थ्यांच्या तुलनेत १३ लाख १० हजार लाभार्थ्यांचे ‘आयुष्मान भारत कार्ड’ तयार करण्यात आले आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व शिधा पुरवठा केंद्रे, सामान्य सुविधा केंद्रे (सीएससी), आपली सेवा केंद्रे, संग्राम केंद्रे आदी ठिकाणी शिबीरे आयोजित करावीत. आयुष्मान भारत ॲपवरही याची सुविधा असून त्याची माहिती नागरिकांना द्यावी, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, राज्याची पूर्वीची महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि २०१८ पासून सुरू करण्यात आलेली केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना एकत्रित करुन राबविण्यात आली. २८ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व कुटुंबांसाठी ‘एकत्रित आयुष्मान भारत- महात्मा फुले जन आरोग्य योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून १ जुलै २०२४ पासून विस्तारीत व्याप्तीसह ही योजना राबविण्यात येत आहे. ही भारतातील रोख रक्कम विरहीत (कॅशलेस) मोठी योजना आहे. दीड लाख रुपयांवरुन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार यात कॅशलेस मिळतात.

या योजनेंतर्गत रुग्णावरील उपचारासाठी ठरवून देण्यात आलेल्या पॅकेजेसचे दर कमी असल्याने त्यात वाढ करण्याच्या रुग्णालयांच्या मागणीच्या अनुषंगाने १ जुलैपासून त्यामध्ये सरासरी २० टक्क्याहून अधिक वाढ करण्यात आली आहे. तसेच वेळेवेळी उपचाराचे पैसे चुकते केले जात असल्यामुळे रुग्णालयांनी रुग्णांना योजनेचा लाभ द्यावा. त्यांनी कॅशलेस काऊंटर सुरू करावेत, असे सांगून कामगिरीत कमी असलेल्या रुग्णालयांना आपली कामगिरी सुधारण्यासाठी काही वेळ दिला जाईल. तथापि, त्यानंतरही कामगिरी सुधारली नाही तर योजनेच्या पॅनेलमधून त्यांना वगळण्यात येईल, असेही डॉ. शेटे म्हणाले.

आयुष्मान योजनेत मोठ्या रुग्णालयांना सहभागी करण्यासाठी प्रयत्न करा-खासदार मेधा कुलकर्णी

शहरात सर्वसामान्यांची नामांकित मोठ्या रुग्णालयांत उपचार मिळण्याची इच्छा असते, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य होत नाही. त्यासाठी अशा रुग्णालयांना योजनेंतर्गत पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा. त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून सहयोग दिला जाईल, असे खासदार श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व कुटुंबांतील सदस्यांची आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी प्रक्रियेला गती देणे गरजेचे असून त्यासाठी पुरवठा विभाग, सीएससी केंद्रांच्या प्रतिनिधींची लवकरच बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल.

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेंतर्गत रस्ते अपघातात जखमी झालेल्या कोणत्याही नागरिकावर १ लाख रुपयांपर्यंत उपचार तात्काळ कॅशलेस पद्धतीने सुरू करण्यात येतील. महाराष्ट्रासोबत देश-परदेशातील नागरिकास योजनेचा लाभ देण्यात येईल, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीत योजनेच्या जिल्हा वरीष्ठ समन्वयक डॉ. प्रीती लोखंडे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

.शेटे यांनी योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांच्या प्रतिनिधींच्या समस्याही यावेळी जाणून घेतल्या.

Comments (0)
Add Comment