काच फोडून नागरिकांना गाडीतून बाहेर काढलं
धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. त्यामध्ये काही गाड्याही पाण्याखाली गेल्या. त्यामुळे गाड्यांमध्ये असलेले लोक गाडीतच अडकून पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी चक्क गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. गाडीची काच फोडून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं.
निंबजनगर भागात अचानक पाणी भरलं. या पाण्यात काही गाड्याही बुडाल्या. गाडीच्या छतापर्यंत पाणी भरलेलं होतं. बुडालेल्या काही गाड्यांमध्ये नागरिक अडकून पडले. त्यांना बाहेर काढण्याचे मोठे प्रयत्न करण्यात आले. अखेर या गाड्यांची काच फोडून त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. अडकलेल्या लोकांना पाहून काही काळ साऱ्यांच्या मनात धडधड सुरु होती. अखेर त्यांना सुखरुप बाहेर काढल्यानंतरप साऱ्यांच्या जीवात जीव आला.
पुण्यात पावसाचं धुमशान, लोकांच्या घरात पाणी
पुण्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्याने मुठा नदीला पूर आला आणि परिसरातील भागात पाणी भरलं. लोकांच्या घरात पाणी शिरलं, तर अनेक इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरल्याने नागरिक अडकून पडले. सध्या त्यांना बोटीतून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरु आहे.
अचानक घरात पुराचं पाणी शिरल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला. लोकांना काय करावं कळेना. नागरिक साखर झोपेत असताना अचानक घरात पाणी शिरलं, काहीही पूर्वनकल्पना नसल्याने नागरिकांना त्यांच्या घरातील सामान वाचवायलाही वेळ मिळाला नाही. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.