खुलताबाद शहरातील अनेक प्राचीन वास्तूंना सुमारे सातशे वर्षांचा इतिहास आहे. बाजारपेठ मंगलपेठ येथे प्राचीन काळापासून पुरातन मोठी श्रीमंत बाजारपेठ होती. येथे मोठ्या प्रमाणात व्यापार चालत. शहरातील अनेक प्रमुख शासकीय कार्यालयदेखील या भागात होती. पूर पालिका, तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, महावितरण कार्यालय, कृषी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भूविकास बँक, सहकारी सोसायटी, खरेदी-विक्री संघ, मंगल पेठ बाजारपेठ या भागात अनेक दुकाने होती. किराणा धान्य, धनधान्य, औषधी, कापड, भांड्यांची दुकाने, बांगड्याची दुकाने, शिंपी टेलर, केश कर्तनालय, सोन्या चांदीचे दुकाने, फुलांची दुकाने, फोटो स्टुडिओ, हॉटेल अशा प्रकारची असे विविध व्यापार त्याकाळी येथे होते. गंज येथील मैदानावर आठवडी बाजार भरत असे. परंतु कालांतराने शहरातील बाजारपेठ वेगवेगळ्या ठिकाणी विखुरली गेली. त्यामुळे आता बाजारपेठ जुना बाजार ओस पडला आहे.
पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थ बाजारपेठ मंगल पेठ येथे खरेदी विक्रीसाठी येत असत. त्याकाळी लाखो रुपयांची उलाढाल होत असे. जुना बाजार गंज येथे आठवडी बाजार भरला जात असे. यानंतर या ठिकाणी ही जागा कमी पडू लागल्याने आठवडी बाजार मंगल पेठ वेशीच्या बाहेरच्या मैदानात गेला. यानंतर या ठिकाणी हळूहळू काही लोक व्यापार सोडून इतर व्यवसायाकडे वळले. अनेक व्यापाऱ्यांची दुकाने बंद पडले. अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली, तर काही जणांनी स्थलांतर करून शहरात इतर ठिकाणी व्यवसाय सुरू केले, तर काही कुटुंब व्यवसाय व शिक्षणानिमित्त बाहेरगावी स्थलांतरित झाली आहेत.
श्री भद्रा मारुती मंदिरामुळे तर अलीकडच्या काळात खुलताबाद शहराची नवी ओळख निर्माण झाली आहे. खुलताबाद शहरात अनेक सुफीसतांच्या दर्गा आहेत. मुगल सम्राट औरंगजेब यांची कबर, बनी बेगम बाग आहे. मंगल पेठ बाजारपेठ येथील प्राचीन मंदिरे असून मंगलादेवी, बालाजी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गणपती मंदिर, महादेव मंदिर, हनुमान मंदिर अशी प्राचीन मंदिरे आहेत. काळाच्या ओघात काही मंदिरांची पडझड झाली असून,श्री मंगला देवी मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. लहानी आळी, मोठी आळी येथील हनुमान मंदिर, महादेव मंदिर आहे.
दगडी बांधकाम असलेले वाडे –
खुलताबाद शहरात इमामवाडा, आजमशाहीपुरा, ख्वाजा मामु गल्ली, छोटी गुमद, आलंग गल्ली, भागात अनेक दगडी बांधकाम आजही दिमाखात उभे आहेत तर अनेक दुमजली इमारती मोडकळीस आले आहेत. लाकडी काम केलेल्या दगडी बांधकाम चिरेबंदी वाडे आजही इतिहासाचे साक्षीदार आहेत. काही घरात तळघर व दुमजली इमारती आजही पाहायला मिळतात. परंतु आता या इमारती नामशेष होत असून काही इमारतींची डागडुजी करून काही कुटुंबे त्यात राहतात. अनेक घरांची पडझड झाली असून जुन्या घरांच्या जागांच्या ठिकाणी आता नवीन बांधकामे होत आहेत. मोडळीस आलेल्या प्राचीन वास्तूंची देखभाल व दुरुस्ती करून हा वारसा जपला पाहिजे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वास्तू जतन करण्याची गरज व्यक्त होत आहे.