पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी अत्याधिक मुसळधार पावसाची शक्यताही हवाान विभागाने वर्तवली आहे. तर, अधूनमधून ६०-७० किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यावेळी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २७ अंश सेल्सियस ते २४ अंश सेल्सियसच्या आसपास असेल.
रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सखळ भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या परिसरात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. तर, वसई विरारमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. नवी मुंबईतही मुसळधार पाऊस सुरु आहे.
प्राचीन शिवमंदिरातील गाभाऱ्यात पाणी
अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचलं आहे. मंदिराच्या बाजूने वाहणाऱ्या वालधुनी नदीला पूर आल्यामुळे गाभाऱ्यात गुडघाभर पाणी साचलं असून त्यामुळे भगवान भोलेनाथाला जलाभिषेक झाला आहे. त्यामुळे भाविकांसाठी गाभारा बंद करण्यात आला असून गाभाऱ्यातील भगवान भोलेनाथाचा मुखवटा गाभाऱ्याच्या बाहेर काढून ठेवण्यात आला आहे. या मुखवट्याचं दर्शन आणि पूजा सध्या भाविक करत आहेत.
तर उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदी दुधडी भरुन वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कल्याण-नगर महामार्गावरील रायते पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कल्याण-नगर मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे.
वालकस पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली
ठाणे जिल्ह्यातील वालकस नदीवरील पूल दरवरषीप्रमाणेच यंदाही पाण्याखाली गेला असून ग्रामस्थ आणि चाकरमानी दोन दिवसापासून गावातच अडकून पडले आहेत
राज्यात कुठे-कुठे पाऊस?
कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.