रत्नागिरी – रायगड शाळांना सुट्टी
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्हा प्रशासनाकडून उद्या २६ जुलै रोजी शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
कोल्हापुरातील शाळा २६ जुलै रोजी बंद
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २६ आणि २७ जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असणार आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, पंचगंगेने देखील धोक्याची पातळी ओलांडली असून राधानगरी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे शाळांना सुट्टी देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
पुण्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर
पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळांना २६ जुलै शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय लोणावळ्यातही पावसाचा जोर कायम असून खबरदारी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोणावळ्यातील १२वी पर्यंत शाळा, महाविद्यालयं २५ तसंच २६ जुलै रोजी बंद राहणार आहेत.
साताऱ्यातही शाळांना सुट्टी
सातारा जिल्ह्यात तसंच घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी साताऱ्यातील शाळा, अंगणवाडी, महाविद्यालयं, सर्व सरकारी आणि खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, आश्रमशाळा यांना २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.