मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाथरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीसह विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी मतदारसंघातील मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी मंत्री संजय राठोड यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते.
पाथरीत आपल्यासाठी सकारात्मक वातावरण
पुढे बोलताना सईद खान म्हणाले की, मागील दोन वर्षापासून पाथरी विधानसभा मतदारसंघाची बांधणी आम्ही करत आहोत. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पाथरी विधानसभा मतदारसंघातील बहुतांश पदाधिकारी आता शिवसेनेसोबत आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील शिवसेनेचे प्राबल्य वाढले आहे. त्यामुळे विरोधकही आता शिवसेनेसोबत येण्यास तयार होत आहे. मतदारसंघातील साई मंदिराचा विकास आराखडा असो की अन्य विकास कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारसंघात शिवसेनेविषयी चांगले वातावरण आहे.
ड्रायव्हर सोडला तर आमदार वरपुडकरांकडे दुसरा कार्यकर्ता नाही
यावेळी काँग्रेस आमदारावर टीका करताना सईद खान म्हणाले की, काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश वरपूडकर यांच्यासोबत मतदारसंघातील एकही कार्यकर्ता राहिला नाही. त्यांचा गाडीचा ड्रायव्हर सोडला तर त्यांच्याकडे माणूस शिल्लक राहिला नाही. सुरेश वरपूडकर स्वतः मतदारसंघात सांगत फिरत आहेत की मी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे असे देखील सांगत असल्याचे शहीद खान म्हणाले. विद्यमान आमदाराने जी कामे करायला हवी होती, ती कामे आम्ही तुमच्या माध्यमातून मतदार संघात केली आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे ते म्हणाले.
मतदारसंघातील भाजपही शिवसेनेसोबत
परंपरागतरित्या पाथरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे आहे. २०१९ मध्ये भाजपच्या मोहन फड यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यांचा काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश वरपूडकर यांनी पराभव केला. त्यामुळे भाजपकडे असलेला हा मतदारसंघ शिवसेनेला सोडवून घ्यावा, अशी मागणी सईद खान यांनी यावेळी केली. मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी देखील शिवसेनेसोबत आहेत. वेळ पडल्यास भाजप जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना देखील आपल्यासमोर उभे करू, असेही सईद खान म्हणाले.
पाथरी विधानसभेवर शिवसेनेचा दावा, महायुतीत होणार संघर्ष
पाथरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून मोहन फड यांच्यासह अन्य बऱ्याच कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. असे असताना देखील शिवसेनेने केलेल्या दाव्याने आता महायुतीमध्येच संघर्ष होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
परंपरागत ही जागा भाजपकडे असल्याने शिवसेनेला का म्हणून सोडायची, हा प्रश्न भाजप विचारेल. शिवसेनेकडून या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली जात आहेत. स्वतः सईद खान या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मागील दोन वर्षापासून मोर्चे बांधणी करत आहेत. तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे पाथरी विधानसभा मतदारसंघ महायुतीत कोणाला सुटेल भाजपकडे राहील की शिवसेनेकडे नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल पण तोपर्यंत तरी शिवसेना आणि भाजपमध्ये या मतदारसंघावरून चांगलाच संघर्ष झालेला पहावयास मिळणार आहे.