Panchank Meaning In Astrology :
भारतात ज्योतिषशास्त्राला अधिक महत्त्व दिले गेले आहे. ज्योतिष्यांच्या आधारे आपण अनेक शुभ कार्य करतो. त्यासाठी घरात काही शुभ प्रसंग करताना पंचांगानुसार आजचा दिवस किती शुभ आहे याची खात्री करुन घेतो.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह- नक्षत्रांचा सगळ्यात आधी विचार केला जातो. पंचांगामध्ये तिथी, वार, योग, ग्रह-नक्षत्र, मुहूर्त, करण यावर अधिक लक्ष असते. परंतु यामध्ये पंचक काल हा सर्वाधिक महत्त्वाचा म्हटला आहे. पंचक लागण्याची वेळ, मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. आज २४ जुलै २०२४ ला संकष्टी चतुर्थीचा योग असून या दिवशी पंचक लागला आहे. या काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई असते.
पौराणिकमध्ये रामायणात असे म्हटले आहे की, श्रीरामांनी रावणाचा वध केला होता, त्यावेळी पंचक लागले होते. ज्योतिषशास्त्रानुसार पंचक काळात कोणाचाही मृत्यू होणे अशुभ मानले जाते. तसेच याकाळात कुटुंबातील पाच जणांचा लागोपाठ मृत्यू होतो. असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. जाणून घेऊया पंचक म्हणजे काय?
1. पंचक म्हणजे काय?
हिंदू पंचांगानुसार नक्षत्राला घटक मानले गेले आहे. यामध्ये काही नक्षत्र शुभ तर काही अशुभ मानली जातात. ज्योतिष्यानुसार धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती ही पाच नक्षत्र एकत्र आल्याने अशुभ मानले जाते. नक्षत्रांच्या या स्थितीला पंचक असे म्हटले जाते.
2. जुलै महिन्यात पंचक कधीपासून?
जुलै महिन्यात पंचक मंगळवार २३ जुलैपासून सकाळी ९ वाजून २२ मिनिटांपासून ते शनिवारी २७ जुलै रोजी दुपारी १ वाजून २ मिनिटांपर्यंत असेल. मंगळवारी हे पंचक आल्यामुळे याला अग्निपंचक असे म्हटले जाते.
3. पंचकमध्ये करु नका या गोष्टी?
ज्योतिष्यानुसार पंचक कालावधीत काही शुभ कार्य करणे निषिध्द मानले जाते. यावेळी लाकडाची खरेदी करु नये. तसेच घराच्या दुरुस्तीचे काम करु नका. या काळात लग्न जमवणे किंवा इतर कोणतेही शुभ करणे वर्ज्य मानले जाते. गरुडपुराणात असे म्हटले गेले आहे की, पंचक दरम्यान ज्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार केला जातो त्या व्यक्तीचा आत्मा मुक्त होत नाही.