या फळांच्या रोपांना जेव्हा पाऊस हवा होता, तेव्हा तो पडला नाही, अन् जेव्हा पाऊस नको होता, तेव्हा जोरदार कोसळल्याने झाडांना लागलेली फुले मोठ्या प्रमाणात गळून गेली. परिणामी, उत्पादन कमी झाले. त्यामुळे बाजारात या दोन्ही फळांची आवक कमी होत आहे. यावर्षी यापुढेही आवक कमीच राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. त्याचाच परिणाम फळांच्या दरांवर पाहायला मिळत आहे.
बाजारात संगमनेर, पंढरपूर, सांगोला, सोलापूर, श्रीगोंदा, फलटण आणि जेजुरीमधून डाळिंबाची आवक होत असते. त्यानुसार आता डाळिंबाची आवक सुरू झाली आहे. मात्र ही आवक दरवर्षीप्रमाणे नाही. यावर्षी आवक अवघ्या ४० टक्क्यांवर आली आहे. हीच परिस्थिती सीताफळाच्या बाबतीतही आहे. सासवड आणि नगर, जुन्नरमधून सीताफळाची आवक सुरू झाली आहे. मात्र त्यांचेही प्रमाण कमी आहे. सध्या घाऊक बाजारातच डाळिंब १५० ते २०० रुपये किलो दराने मिळत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात डाळिंबांचा दर २०० ते ३०० रुपये किलोवर पोहोचला आहे. तर, सीताफळाला १०० ते २०० रुपये किलोचा दर आहे.
गुजरातच्या डाळिंबांना उठाव नाही
महाराष्ट्रातून डाळिंब कमी येत असल्याने गुजरातवरूनही डाळिंब येण्यास सुरुवात झाली आहे, मात्र ही गुजरातची डाळिंबे आतून पांढरीफटक असल्याने त्यांना उठाव नसल्याचे व्यापारी दिलीप खोत यांनी सांगितले.