Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Kargil Vijay Diwas 2024: जान देने की रुत रोज आती नहीं! राज्यातील कारगिल युद्धात शहीद २५ जवानांच्या शौर्याला उजाळा
जम्मू-काश्मिरच्या कारगील जिल्ह्यात १९९९साली भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध भडकले. दीर्घकाळ चाललेल्या या युद्धात शत्रूशी लढताना राज्यातील २५ जवान शहीद झाले. आठ जवानांनी निधड्या छातीने सामोरे जात शत्रूचा बिमोड केला. युद्धभूमी गाजविणाऱ्या या वीर जवानांच्या शौर्याचा आज, २६ जुलैला कारगील विजय दिनानिमित्त आठव केला जाणार आहे. यंदाचे हे २५वे वर्ष आहे.
हुतात्मा जवान
शिपाई कृष्णा समरिक (पूलगाव, जि. वर्धा), शिपाई महादेव पाटील (वडगाव, जि. सांगली), हवालदार सुरेश चव्हाण (करोळी, जि. सांगली), लान्स नाइक एकनाथ खैरनार (देवघाट, जि. नाशिक), लान्स नाइक सुरेश सोनावणे (काझी सांगवी, जि. नाशिक), नाईक नारायण साळुंखे (अनपटवाडी, जि. सातारा), सुभेदार कृष्णांत घाडगे (ललगूण, जि. सातारा), शिपाई महादेव निकम (अंतवाडी, जि. सातारा), सिग्नल मॅन शशिकांत शिवतरे (कळंबे, जि. सातारा), शिपाई गजानन मोरे (भुटकेवाडी, जि. सातारा), कॉन्स्टेबल अशोक बिरंजे (वैरागवाडी, जि. कोल्हापूर), शिपाई मच्छिंद्र देसाई (कळे, जि. कोल्हापूर), लान्स नाइक बालाजी माले (पानगाव, जि. लातूर), कॅप्टन के. सी. धाराशिवकर (उदगीर, जि. लातूर), शिपाई तुकाराम भोईटे (सोहोली, जि. रत्नागिरी), शिपाई वजीर रास्ते (ओझर, जि. पुणे), कॅप्टन नितीन चव्हाण (टिंगरेनगर, पुणे), शिपाई मुंजा तेलभरे (फुरसंगी, जि. पुणे), लान्स नाइक शंकर शिंदे (पिंगोरी, जि. पुणे), शिपाई संभाजी शिलीमकर (विहीर, जि. पुणे), लान्स नाइक अंकुश जवक (रांजनगाव, जि. अहमदनगर), शिपाई भानुदास गायकवाड (सुपा, जि. अहमदनगर), शिपाई सुभाष सानप ( वडझरी, जि. बीड), सुरेश देशमुख (सोनंद, जि. सोलापूर), कॅप्टन एफ.एच. मर्चंट (मिस्त्रीनगर, ठाणे).
निकराचा लढा देत जायबंदी वीरपुत्र
कारगीलच्या लढाईत बुलढाणा जिल्ह्यातील दोन वीर सुपुत्रांसह राज्यातील आठ जवान जखमी झाले. निकराची झुंज देत आपल्या तुकड्यांसोबत प्राणपणाने लढताना त्यांना दिव्यंगत्व आले. बुलढाणा तालुक्यातील रायपूरचे हवालदार राजू खंडागळे, शेगावचे नायक कैलास तायडे यांच्यासह माढा (सोलापूर)चे शिपाई भारत पाटील, अहमदनगरचे शिपाई एकनाथ पवार, फोंडवाडा (बारामती, जि. पुणे) येथील हवालदार संतोष पिसाळ, गोळेगाव (शिरुर, जि. पुणे)चे नायक शरद गायकवाड, वेर्ले (सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग)चे नायक बाळकृष्ण राऊळ व नाशिकचे नायक भूषण शेवाळे यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे.
चौघांना शौर्य पदक
कारगीलच्या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले एअर फोर्सचे अधिकारी ठाण्याचे सार्जंट तपोश घोष यांना वायूसेना पदकाने गौरविण्यात आले. धाराशीव येथील १८ ग्रिनेडियर्सचे कॅप्टन सचिन निंबाळकर यांना वीरचक्र, कोल्हापूरचे ब्रिगेडियर विक्रांत पाटील यांना सेना मेडल आणि घोरपडी पुणेचे लद्दाख स्काउटमधील लेफ्टनंट कर्नल दिनेश नायकवडी यांना युद्ध सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
आज साताऱ्यात गौरव सोहळा
कारगिल विजय दिनानिमित्त आज, शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे कारगील युद्धात शौर्य गाजविणाऱ्या जवानांचा गौरव करण्यात येणार आहे. या सन्मानार्थ बुलढाणा जिल्ह्यातून रायपूरचे रहिवासी राजू खंडागळे व शेगावचे कैलास तायडे हे साताऱ्याला रवाना झाले आहेत.