Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुराच्या पाण्याने घरात चिखल, पुणेकरांना रात्र वैऱ्याची, डगमगत्या बोटींतून सुटका

8

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पुराचे पाणी शिरल्याने घरात सगळा चिखल झाला असून, आता पुन्हा सगळा संसार उभा करण्याशिवाय पर्याय नाही. इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गृहोपयोगी वस्तू नव्याने घ्याव्या लागतील किंवा त्यांची दुरुस्ती करावी लागेल,’ कुटुंबियांसोबत घरात साचलेला चिखल काढताना अनिकेत गरूड सांगत होते; तर पुराच्या पाण्यामुळे किराणा दुकानातील सर्व वाण सामान, साहित्य भिजल्याने झालेल्या नुकसानाचा हिशोब करताना हताश झालेले नारायण प्रजापतीही ‘आता पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल,’ असे म्हणत होते…

मुसळधार पाऊस आणि खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडलेल्या विसर्गामुळे सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी, निंबज नगर, विठ्ठल नगर परिसरातील नदीकाठच्या अनेक सोसायट्या, अपार्टमेंटमध्ये मध्यरात्रीपासून पाणी साचण्यास सुरुवात झाली. पहाटेपर्यंत तळमजल्यावर असलेल्या सदनिका आणि पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने स्थानिक रहिवाशांची झोप उडाली. ‘पहाटे तीन वाजता पाणी शिरू लागले अन् पाहता पाहता पार्किंगमध्ये पाणीपातळी छातीपर्यंत वाढली. मध्यरात्रीपासूनच वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे मोबाइलही ‘डिस्चार्ज’ आहे. वाहने अगोदरच लांब चौकात लावून ठेवल्याने वाचली,’ अशी ‘आपबीती’ श्रीगणेश अपार्टमेंटमध्ये राहणारे सुनील चव्हाण सांगत होते.

‘रात्रीपासून गेली वीज’

‘एकतानगरीतील इमारतीत पहिल्या मजल्यावर मी राहतो. रात्री दोन वाजल्यापासून वीज गेली. त्यानंतर लोकांचा आरडाओरडा ऐकू येत होता. पहाटेपर्यंत पार्किंगमध्ये गुडघ्याएवढे पाणी साचले. कुटुंबीय गावाला गेले असल्याने घरी मी एकटाच होतो. बचावकार्य करणाऱ्यांनी मला पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले. जनता वसाहतीत माझा दवाखाना असून, आता तिथेच मुक्काम करणार आहे,’ असे डॉ. कैलास चरखा यांनी सांगितले.
Mumbai Rains : मुसळधार पाऊस तरी सुट्टीच्या घोषणेस विलंब, मुख्याध्यापकांचे हात बांधलेले, विद्यार्थी-पालक हवालदिल

बोटीने सुरक्षितस्थळी आणले

पुणे महापालिका व ‘पीएमआरडीए’चे अग्निशमन दल, ‘एनडीआरएफ’, लष्कराच्या मराठा लाइट इन्फंट्रीच्या जवानांनी नागरिकांच्या बचावासाठी एकतानगरी परिसरात तातडीने धाव घेतली. पाणी शिरलेल्या सोसायट्यांमध्ये अडकलेले ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांना बोटीने सुरक्षित ठिकाणी आणले. शिवपुष्प पार्क चौकापासून एकतानगरीकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली होती.

‘प्रशासनाने ‘अलर्ट’ दिलाच नाही’

आनंद पार्क सोसायटीत राहणाऱ्या स्नेहल केसकर यांनी, प्रशासनाने आधीच माहिती न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘आम्ही पहाटे साडेतीनपासून जागेच आहोत. पाणी शिरायला सुरुवात झाल्यावर सर्वप्रथम वाहने पार्किंगमधून काढून वरच्या चौकात लावली. साडेपाचच्या सुमारास जिन्यात पाणी आले. घरापासून अवघ्या पाच पायऱ्यांवर पाणी होते. संसारोपयोगी वस्तू कशा सांभाळायच्या, अशी चिंता सतावू लागली. धरणातून विसर्ग करताना पाणी शिरणार असेल, तर प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा दिला जातो. या वेळी काहीच सांगितले नाही. त्यामुळे अनेकांची धावपळ झाली,’ असे त्या म्हणाल्या. त्यावर ‘अग्निशमन दलाचे जवान वगळता महापालिका प्रशासन व अन्य आपत्ती यंत्रणा मदतीला आल्या नाहीत,’ असे वैभव काणेकर यांनी सांगितले.

तरुणांचे प्रसंगावधान

एकता नगर परिसरात पुराचे पाणी शिरल्याने अनेक जण अडकले होते. त्यांना सुखरूप ठिकाणी जाता यावे, यासाठी अनेक जण प्रयत्न करीत होते. सनसिटी रस्ता परिसरातील अजय शितोळे आणि त्याच्या मित्रांनी परिसरातील झाड आणि खांबांना दोरी बांधून पाण्यातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मदतीचा हात दिला.

चहा, दूधपिशव्या, मेणबत्त्यांचे वाटप

मुसळधार पावसात गुडघाभर साचलेल्या पुराच्या पाण्यातून वाट काढत योगेश डांगरे हातातील पिशव्यांमध्ये असलेल्या थर्मासमधून बचावकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कागदी कपात गरम चहा देत होते. ‘मी जवळच्या साईटेरेस सोसायटीत राहतो. नदीचे पाणी अचानक शिरल्याने आसपासच्या सोसायट्यांतील रहिवाशांना पुरेसा वेळच मिळाला नाही. त्यांच्या सुटकेसाठी महापालिका व पोलिसांसह विविध सरकारी यंत्रणांचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. बचाव व मदतकार्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना घोटभर चहा देण्यासाठी मी येथे आलो आहे,’ असे ते सांगत असताना बचाव कार्य कर्मचारी त्यांच्या हातातून चहाचा कप घेत धन्यवाद देत होते. ‘महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारीही हातात दूधाच्या पिशव्या आणि बिस्किटांचे पुडे वाटत होते. पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने घरात अडकलेल्या लोकांनी खिडकीतून दोरी लावून पिशव्या सोडल्या होत्या. त्यात दूध पिशव्या आणि बिस्किटांचे पुडे ठेवत आहोत,’ असे कर्मचारी गणेश सकट यांनी सांगितले. अनेक घरांमध्ये अंधार असल्याने नाश्ता व मेणबत्त्यांचेही वाटप करण्यात आले.
Pune Rain: पुण्यात पावसाचा रुद्रावतार, सर्व उच्चांक मोडले, आजही दक्षतेचा इशारा
पहाटेच्या वेळेला पावसाचा, पाण्याचा आवाज येत होता. त्याच्या जोडीला लोकांचा आरडाओरडाही ऐकू येत होता. त्यामुळे काहीतरी संकट आल्याचा अंदाज आला. खिडकीतून पाहिल्यावर पाणी दिसले. त्यामुळे लोकांच्या मदतीसाठी जावे, या विचाराने इमारतीखाली आलो. मात्र, खाली आल्यावर माझी जीवनवाहिनी, भाजी विक्रीची हातगाडीच वाहून जात असल्याचे दिसले. त्यामुळे जिवाच्या आकांताने पाण्यातून पळत जाऊन हातगाडीपर्यंत पोहोचलो. छातीएवढ्या पाण्यातून हातगाडी पुन्हा घेऊन आलो. हातगाडी सुखरूप बाहेर काढल्याने जिवात जीव आला.
– महादेव काळओघे, भाजी विक्रेता, अमेय सोसायटी परिसर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.