Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अवघ्या काही महिन्यांवर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. योग्य रणनीती आखून निवडणुकीला सामोरे गेल्यास लोकसभेप्रमाणे यश मिळेल, अशा आशावाद काँग्रेस नेते व्यक्त करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभा जागावाटपाचे सूत्र निश्चित करून उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारसंघात अधिक वेळ मिळेल परिणामी अंतिम निकालात त्याचे प्रतिबिंब उमटेल, असे काँग्रेस नेते सांगत आहेत. त्याचमुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अनुमतीने काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ही समिती जाहीर केली.
समितीमध्ये कुणाकुणाचा समावेश?
काँग्रेसने जागा वाटपासाठीच्या वाटाघाटीसाठी नेमलेल्या समितीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री आरिफ नसीम खान, माजी मंत्री सतेज पाटील यांचा समावेश आहे. तर मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीमधून मुंबई काँग्रेसचे अध्यक्षा वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री असलम शेख यांचा समावेश आहे. या समितीमध्ये सामाजिक आणि प्रादेशिक समतोल राखण्याचाही काँग्रेसने पुरेपूर प्रयत्न केला आहे. याआधी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची एकाधिकारशाही असल्याची पक्षात दबक्या आवाजात चर्चा व्हायची. यावेळी मात्र प्रादेशिक आणि सामाजिक अशी सांगड घातल्याने सर्वसंमतीने निर्णय होतील, असा वरिष्ठांचा मानस आहे.
‘अच्छे दिन’ आल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढली
महाविकास आघाडीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटपासाठीच्या चर्चांना वेग आला आहे. कोणत्या जागांवर लढायचे, कोणत्या जागा आपल्यासाठी अनुकूल आहेत तसेच इतर पक्षातील कोणते नेते गळाला लागू शकतात, अशा बेरजेच्या राजकारणाची चाचपणी देखील सर्वच पक्षात सुरू आहे. काँग्रेस पक्षाला लोकसभा निकालांत ‘अच्छे दिन’ आल्यानंतर इच्छुकांची संख्याही वाढली आहे. विधानसभेच्या तोंडावर जागावाटपाचे गुऱ्हाळ सुरू ठेवून पक्षाला बसणारा संभाव्य फटका टाळण्यासाठी आत्तापासून निवडणूक रणनीती आखण्याचे पक्षातील वरिष्ठांचे आदेश आहेत.