Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nashik News: जेलमधून सुटलेल्या ‘भाई’ची रॉयल एन्ट्री! पंटर लोकांची एक चूक अन् भाईवर नवा गुन्हा दाखल

6

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराची नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातून मंगळवारी (दि. २३) सुटका झाल्यावर सराईत गुन्हेगार असलेल्या समर्थकांनी त्याच्या स्वागतासाठी शहरातून जंगी मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शरणपूररोड भागातील बेथेलनगर ते आंबेडकर चौक, साधू वासवानीरोड, शरणपूररोडवर कार व दुचाकी वाहनांच्या ताफ्यात ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सराईत गुन्हेगारांसह तडीपार गुंडांचाही समावेश असल्याने सरकारवाडा पोलिस ठाण्यात कारागृहातून सुटका झालेल्या गुन्हेगारांसह इतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हर्षद सुनील पाटणकर याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हर्षदला जुलै २०२३ मध्ये एमपीडीए कायद्यानुसार नाशिकरोड कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केले होते. त्यानंतर हर्षदची मंगळवारी कारागृहातून सुटका झाली. त्यामुळे बेथेलनगर येथील हर्षदच्या मित्रपरिवारासह समर्थकांनी मंगळवारी दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास बेथेलनगर, आंबेडकर चौक, साधू वासवानीरोड, शरणपूररोड या मार्गावर कार (एमएच १५, जीएक्स ८७२१ )मधून हर्षदची मिरवणूक काढली. शहराच्या मध्यवर्ती भागातून गुन्हेगाराच्या मित्रपरिवाराने आरडाओरड करीत, जोरदार घोषणाबाजी करीत मिरवणुकीला सुरुवात केली. रस्त्यात विनाकारण वाहनांचे हॉर्न वाजवत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित पाटणकरसह मिरवणुकीत सहभागी तडीपार असलेले गुंड गोपाल नागोरकर, वेदांत चाळदे यांच्यासह शॉन मायकल, जॉय मायकल, रॉबीन्सन बत्तिसे, वैभव खंडारे, विकास नेपाळी (सर्व रा. बेथेलनगर) यांच्याविरोधात पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करीत विनापरवानगी जमाव गोळा करून मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
Pune Crime: मित्राला संपवून मृतदेह रेल्वेरुळावर टाकला; पुरावा नष्ट करण्यासाठी दोघाचं भयंकर कृत्य, काय घडलं?
सोशल मीडियावरही दहशतीचा प्रयत्न

कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारासह त्याच्या समर्थकांनी शहरातून मिरवणूक काढत गुन्हेगारीच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न केला. यासह अशा अन्य उद्योगांचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर टाकून दहशत माजविण्याचे प्रयत्नही होत असल्याने हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. गुन्हेगारांचे अशापद्धतीने वागणे थेट पोलिसांनाच आव्हान असल्याचीही चर्चा शहरात आहे. पोलिसांबरोबर रील्स टाकून प्रतिस्पर्धी टोळ्यांनाही अप्रत्यक्षरीत्या आव्हान देण्याचे प्रकार वाढल्याचेही बोलले जात आहे.

तडीपार शहरातच

शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील सुमारे शंभर गुन्हेगारांना तडीपार केले आहे. मात्र, त्यापैकी बहुतांश गुंड शहरातच आढळतात. त्यातील काही गुंडांनी तडीपारी काळात शहरातच गुन्हे केल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे तडीपारी कारवाईचे आकडे कागदावरच राहिल्याचे दिसत असून, प्रत्यक्षात कारवाईत गांभीर्य नसल्याची चर्चा आहे. यातील काही तडीपार मिरवणुकीत पाहायला मिळाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर नाशिककरांनी शंका व्यक्त केली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.