Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबईसह नवी मुंबईमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. यातच ही मोठी दुर्घटना घडली आहे. पहाटे ४ च्या सुमारास इमारतीखाली एक रिक्षावाला आला असता त्याला बिल्डींगच्या पिलरमधून आवाज येत होता. त्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन तात्काळ इमारतीतील रहिवाशांना जागे केले आणि इमारत रिकामी केली. अवघ्या १५ मिनिटांत इमारत रिकामी करण्यात आली. त्यानंतर पुढील ५ मिनिटांत ही इमारत पत्त्यांसारखी कोसळली आहे. त्यामुळे इमारतीतील रहिवासी भयभीत झाले आहेत.
रिक्षावाला ठरला देवदूत
या दुर्दैवी घटनेत रिक्षावाल्यामुळे इमारतीतील सर्व रहिवाशांचे प्राण वाचले आहेत. पहाटे ही इमारत कोसळली, रस्त्यावरुन नागरिकांची ये-जा सुरु नव्हती यामुळे आणखी एक संभाव्य धोका टळला आहे. मात्र रहिवाशांचे यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक गाड्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या आहेत. यामुळे रहिवाशांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.
बेलापूर सेक्टर १९ मधील ही खूप जुनी इमारत होती. जुनी इमारत असूनही नोटीस बजावली गेली नाही का? असा सवाल या दुर्घटनेनंतर उपस्थित केला जात आहे. या दुर्घटनेने संपूर्ण बेलापूर परिसर हादरला आहे. इमारत कोसळताच आजूबाजूच्या इमारतीतील लोकांनी एकच गर्दी केली आहे. तर अग्निशमन दलाच्या पथकाकडून ढिगारा हटवण्याचं काम सुरु आहे.
मुंबईतील ग्रांट रोड मध्येही अलीकडेच इमारत दुर्घटना
मुंबईच्या ग्रँट रोड (पश्चिम) येथील रेल्वे स्थानकाजवळील स्लेटर रोड येथे रुबिनिसा मंझिल नावाची चार मजली इमारत कोसळली होती. याच इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या निवासी इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळला. ज्यामध्ये ढिगाऱ्याखाली येऊन एका महिलेचा मृत्यू झाला. तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाले होते.